क्रिकेट कॉर्नर : खेळाडूंच्या पत्नीला लक्ष्य का केले जाते

– अमित डोंगरे
भारतीय क्रिकेट चाहते म्हणजे अजब रसायन आहे. एखादा खेळाडू चांगला खेळला तर त्याचे श्रेय त्याच्या कतृत्वाला दिले जाते. मात्र, अपयशी ठरला तर त्याच्या पत्नीला दोष दिला जातो. विराट कोहली अपयशी ठरत असताना अनुष्का शर्माला लक्ष्य केले जात होते. त्यानंतर रोहित शर्मा अपयशी ठरत आहे तर त्याच्या पत्नीला दोष दिला जात आहे. आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पहिल्या काही सामन्यांत मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव अपयशी ठरला तर त्याच्या पत्नीवर खापर फोडले गेले. हे सगळे काय चालले आहे. आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत.
परवा सूर्यकुमारने शतकी खेळी केल्यावर दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती. तो म्हणाला आता प्रेक्षक म्हणणार नाहीत की माझी पत्नी देविशा आली होती म्हणून मी शतक फटकावू शकलो नाही. तिने माझी तीनही आंतरराष्ट्रीय शतके पाहिलेली नाहीत. मात्र, यावेळी आयपीएलचे शतक तिने पाहिले व मला त्याचा सर्वात जास्त आनंद झाला.
या त्याच्या बोलण्यातून एकच गोष्ट सिद्ध होते की, प्रेक्षकांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्याचा खेळाडूंवर किती विपरीत परिणाम होत असेल. बरे ही असली मते केवळ चाहतेच व्यक्त करतात असे नाही तर विक्रमादित्य सुनील गावसकर यांनीही कोहलीच्या अपयशाला अनुष्काला जबाबदार धरल्याचे उदाहरण आहे. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया तर अत्यंत हिन दर्जाची होती ती इथे लिहिताही येणार नाही.
आपण सोशल मीडियावर काय लिहितो किंवा कोणत्या भाषेत व्यक्त होतो हे सामान्यज्ञानही इतक्या मोठ्या खेळाडूला असू नये याचे वाईट वाटते, पण त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. हेच जर परदेशात घडले असते तर त्या व्यक्तीला ट्रेस केले गेले असते. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याची तिकडे धमक असते.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने वर्णद्वेषी टीका करणाऱ्या व्यक्तीला ट्रेस केले व त्याच्यावर आजन्म बंदी लावली की त्याला ऑस्ट्रेलियातील कोणत्याही मैदानावर प्रवेश देण्यात येणार नाही अशी तरतूद केली. हे आपल्याकडे घडणार का? केवळ एकच उदाहरण आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने मुंबई पोलिसांशी वाद घातला होता तर मुंबई क्रिकेट संघटनेने कोणत्याही दबावाला बळी न पडता आजही त्याला वानखेडेत प्रवेश बंदी केली आहे. अशा टीका करणाऱ्यांवर हे असेच उपाय लागू पडतात.





