क्रिकेट कॉर्नर ( #IPL2022 ) : प्रशिक्षकांचे नक्की काम काय ?

– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धा सुरु होउन जेमतेम चार दिवस होत आहेत पण या कालावधीत झालेल्या सामन्यांतील खेळाडूंची कामगिरी पाहता या संघांचे दीग्गज प्रशिक्षक नक्की काय करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दिशाहीन गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण, सुमार खेळाडूंना महत्वाच्या जागी क्षेत्ररक्षणाला उभे करणे, फलंदाजीचा क्रम, दडपणाखाली व कोणत्या गोलंदाजासमोर कोणता फलंदाज खंबीरपणे उभा राहु शकतो याचा अंदाज या सर्व बाबतीत अनेक संघांची गफलत झाल्याचे पाहायला मिळाले.
स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला व एकवेळ कोलकाता हा सामना हरणार असे वाटत असतानाच त्यांनी बाजी फिरवली व चेन्नईचा पराभव केला. केवळ चेन्नईलाच नव्हे तर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बेंगळुरु व लखनौ सुपर जायंट्स या संघांना सामना जिंकण्याची पुरेपुर संधी असतानाही पराभवांचा सामना करावा लागला. या सर्व ससंघांचे पराभव वर नमुद केलेल्याच कारणांनी झाले.
चेन्नईच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली त्यामुळेच त्यांना दीडशतकी धावाही उभारत्या आल्या. मुंबईलाही मोठी धावसंख्या उभारूनही गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळे सामना गमवावा लागला. हीच परिस्थिती बेंगळुरुसमोर निर्माण झाली. द्विशतकी धावा करुनही गोलंदाजांचे अपयश व क्षेत्ररक्षकांची गचाळ कामगिरी बेंगळुरुला भोवली. पंजाबचे पाच फलंदाज बाद केल्यावरही त्यांच्या शाहरुख खान व ओडेन स्मिथ यांनी बेंगळुरुच्या हातातोंडाशी आलेले विजय हिरावुन घेतला. त्याला कारण हर्षल पटेलने केलेली सुमार कामगिरी तसेच त्याचे बालिश क्षेत्ररक्षण त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.
यंदाच्या स्पर्धेतील नवो संघ असलेल्या लखनौ व गुजरात यांच्या सामन्यातही हेच घडले. लखनौने सामना आपल्या बाजूने फिरवला होता मात्र, त्याचवेळी गुजरातच्या राहुल तेवतियाने वादळी फलंदाजी केली व लखनौच्या तोंडातून घास काढून घ्यावा तसा सामना काढून घेतला. मात्र, प्रत्यक्ष मैदानावर जरी खेळाडू अपयशी ठरले तरी त्याची नैतिक जबाबदारी सपोर्ट स्टाफनेच घ्यायला हवी.
मान्यता प्राप्त मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असा प्रचंड ताफा असतानाही हे संघ पराभूत झाले. मग हाच मुद्दा पुढे येतो की हा सगळा सपोर्ट स्टाफ नक्की काय काम करतो. ही स्पर्धा टी-20 क्रिकेटची आहे व त्यात एक चांगली खेळी, एक चांगले षटक व एखादे अफलातून क्षेत्ररक्षण संपूर्ण सामन्याचा निकाल बदलू शकते. हे सर्व माहिती असूनही प्रशिक्षक केवळ डगआऊटमध्ये बसून सुमार कामगिरी पाहून निराशा दाखवतात. हा अभिनय करण्यापेक्षा सामन्यापूर्वी व सामना सुरु असताना खेळाडूंना योग्य मार्गदर्शन केले तर निकाल बदलू शकतो.





