क्रिकेट कॉर्नर : ऑस्ट्रेलियासारखी मानसिकता हवी…

भारतात सुरु असलेल्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेला आमच्या दृष्टीने कोणतेही महत्व नाही हेच दाखवून देत ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सहा प्रमुख खेळाडूंना मायदेशी पाठवले. त्यांच्या जागी संघात केव्हातरी संधी मिळत असलेल्या राखीव खेळाडूंना भारताशी खेळण्यासाठी संघात स्थान दिले. याला म्हणतात खरे व्यावहारीक. आपण त्यांच्यासारखे कधी बनणार. आपण विश्वकरंडकाची अंतिम फेरी गमावली म्हणजेच विजेतेपद गमावला पण त्यांनी विजेतेपद मिळवले. आता आपण त्यांना टी-20 मालिकेत हरवत आनंद साजरा करत आहोत.
ऑस्ट्रेलिया हा कसा संघ आहे हे कळण्यासाठी मुळात त्यांच्या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अभ्यासणे गरजेचे आहे. मागे एकदा सचिन तेंडुलकर म्हणाला होता, की ऑस्ट्रेलियाला हरवणे कठीण आहे परंतू ते देखील चुका करतात व त्याची वाट पाहणे किंवा अशी व्युहरचना तयार करणे की ते स्वतः चुका करतील. आपण सध्या त्यांच्या चुका शोधण्यावर भर देत आहोत पण त्यांच्या दुय्यम संघाविरुद्ध. त्यांचा प्रमुख संघ समोर असला की आपले महान पंक्तीतील खेळाडू सपशेल अपयशी ठरतात.
त्यांचाच नव्हे तर जागतिक क्रिकेटचा देव म्हणतात ते सर डॉन ब्रॅडमन म्हणायचे की, मला प्रत्येक चेंडूवर धावा दिसतात. कधी सहा, कधी चार, कधी तिन, कधी दोन तर कधी एक. म्हणजे धाव न घेता चेंडू खेळून काढणे त्यांच्या मानसिकतेतच बसत नाही. चेंडू निर्धाव गेला तर त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरचा गुन्हेगार समजत असावेत. बरे ब्रॅडमन म्हणाले, ती अतिशयोक्ती अजिबात नाही कारण त्यांची स्टेडियम इतकी मोठी आहेत की त्यावर फलंदाज पाच धावाही धावून घेत होते.
डेनिस लिली अंब्रेला क्षेत्ररक्षण लावायचा त्यावेळची ही गोष्ट आहे. आता तसे क्षेत्ररक्षण लावण्याची हिंमत अन्य संघातच काय परंतू ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांमध्येही दिसत नाही. तो काळ वेगळा होता मात्र, तरीही वर्षानुवर्षे त्यांची मानसिकता काहीही करा पण सामना जिंका हीच होती व अशीच राहील.
आता ऑस्ट्रेलियाचा नवखा संघ भारताविरुद्ध टी-20 मालिका हरला की आपण छाती बडवून जगाला सांगायला मोकळे की आम्ही जगजेत्त्या संघाला पराभूत केले. अहो पण त्या संघात खेळाडू कोण होते ते पाहीले की आपल्या विजयाचा दर्जा सहज लक्षात येइल. नाही म्हणायला काही गोष्टी या मालिकेद्वारे आपल्याला गवसल्या. ते म्हणजे यशस्वी जयस्वालला मुख्य संघात घेणे गरजेचे आहे. इशान किशनला लोकेश राहूलच्या जागी मध्ये-मध्ये खेळवणे गरजेचे आहे. दोन सलामीवीर जायबंदी असतील तर ऋतूराज गायकवाडही चांगला पर्याय ठरु शकतो.
गोलंदाजीबाबत इतक्यात काही बोलावेसे वाटत नाही. कारण कीतीही बळी घेतले तरीही कृष्णा काही प्रसिद्ध होणार नाही व रवी बिष्णोईने चमकदार कामगिरी केली तरीही मुख्य संघात त्याला कुलदीप यादव असेपर्यंत संधी मिळणार नाही. असो, मालिका अद्याप सुरु असून त्यावर बोलायला खूप वेळ आहे. मात्र, आता तरी ऑस्ट्रेलियाकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे सकारात्मक मानसिकता व कोणत्याही परिस्थितीत सामना हातातून सोडायचा नाही ही जिद्दी वृत्ती. तरच आपण जागतिक क्रिकेटवर राज्य करतो असे म्हटले तर योग्य ठरेल.





