पिंपरी | आजपासून 11 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा सुरू

पिंपरी, (प्रतिनिधी) – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून 11 वर्षाखालील मुलांच्या समर व्हेरॉक कप ह्या उन्हाळी 20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ते 31 मे दरम्यान होणार्या या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह एकून आठ संघ सहभागी होणार आहेत.
यामध्ये आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, विराग क्रिकेट अकॅडमी, रायझिंग स्टार क्रिकेट अकॅडमी, एच .के. बाऊन्स, स्कोअर स्पोर्ट्स अकॅडमी, कोकाटे क्रिकेट अकॅडमी व रविंद्र निंबाळकर क्रिकेट अकॅडमी अशा नामांकित आठ संघांना निमंत्रित करण्यात आले आहे,
सुरुवातीला दोन गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील. अंतिम सामना शुक्रवारी (दि.31)होईल. थेरगाव येथील मैदानावर उद्या (दि.28) स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेतील प्रत्येक सामना 20 षटकांचा असेल.
प्रत्येक सामन्यातील योद्धा खेळाडू, सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल. भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्या क्रिकेट संघाला गौरविण्यात येणार आहे.





