Ashes Series 25/26 : प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेचे वेळापत्रक जाहीर…! जाणून घ्या, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील 5 सामन्याविषयी सर्व डिटेल्स एका क्लिकवर…

AUS vs ENG (Schedule for Ashes 25/26 announced) : कसोटी क्रिकेटमध्ये, चाहते प्रतिष्ठेच्या आणि ऐतिहासिक कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली जाणारी ॲशेस ही कसोटी मालिका आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील क्रिकेटच्या सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक कसोटी मालिकेतील ॲशेस 2025-26 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
यंदा ॲशेस मालिकेच्या यजमानपदाचा मान हा ऑस्ट्रेलियाकडे आहे. गेल्या ॲशेस मालिकेचं आयोजन हे इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं. तेव्हा ही प्रतिष्ठेची मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली होती. आगामी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीचा भाग असणार आहे. ही रोमांचक पाच सामन्यांची मालिका 21 नोव्हेंबर 2025 पासून पर्थ येथे सुरू होईल आणि 8 जानेवारी 2026 रोजी सिडनी येथे संपेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील सर्व सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे निश्चित केली आहेत.
कधी आणि कुठे खेळली जाईल ॲशेस 2025-26…
मालिकेची सुरुवात 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पर्थ स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीने होईल. यानंतर दुसरा कसोटी सामना 4 ते 8 डिसेंबर या कालावधीत ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर दिवस-रात्रीच्या स्वरूपात खेळवला जाईल. तिसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे 17 ते 21 डिसेंबर दरम्यान खेळला जाईल, तर पारंपारिक बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे 26 ते 30 डिसेंबर दरम्यान खेळली जाईल. शेवटची आणि निर्णायक कसोटी नवीन वर्षाची कसोटी म्हणून सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) 4 ते 8 जानेवारी 2026 या कालावधीत होणार आहे.
Back-to-back Ashes summers 🤩
The dates for the 2025/26 NRMA Insurance Ashes have been locked in, with the West Test to start things off on November 21st, 2025.
Read more 📰 https://t.co/rLJBVF8AgC pic.twitter.com/C2CGacpsVG
— Cricket Australia (@CricketAus) October 16, 2024
ॲशेस 2025-26 वेळापत्रक :
पहिली कसोटी : पर्थ स्टेडियम, 21-25 नोव्हेंबर 2025
दुसरी कसोटी (दिवस-रात्र) : गाबा ,4-8 डिसेंबर 2025
तिसरी कसोटी : ॲडलेड ओव्हल स्टेडियम, 17-21 डिसेंबर 2025
चौथी कसोटी : मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, 26-30 डिसेंबर 2025
पाचवी कसोटी : सिडनी क्रिकेट मैदान, 4-8 जानेवारी 2026
ॲशेस मालिका : हेड टू हेड रेकाॅर्ड….
आतापर्यंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 73 ॲशेस मालिका खेळल्या गेल्या आहेत, कांगारुंनी तब्बल 34 वेळा या मालिकेवर आपलं नाव कोरलंय. तर इंग्लंडने 32 वेळा ॲशेस ट्रॉफी उंचावली आहे. तर 7 वेळा ही मालिका बरोबरीत राहिली आहे. दोन्ही संघांनी ॲशेसमध्ये सलग आठ वेळा विजय मिळवण्याचा विक्रम केला आहे. 1882-83 ते 1890 या काळात इंग्लंडने हा पराक्रम गाजवला, या काळात इंग्लंडने 16 कसोटी सामने जिंकले आणि फक्त चार सामने गमावले.
दरम्यान, इंग्लंडसोबत 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2023 मधील ॲशेस ट्रॉफी राखली आहे. आता 2025-26 मध्ये कोणता संघ ॲशेस ट्रॉफीवर कब्जा करतो हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.





