रिऍल्टी क्षेत्राकडून पतधोरणाचे स्वागत

नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर सध्याच्या पातळीवर कायम ठेवण्याचे पतधोरण सकाळी जाहीर केले. हे पतधोरण रिऍल्टी क्षेत्रासाठी पूरक आहे, असे या क्षेत्रातील उद्योजकांनी सांगितले.
काही दिवसापासून घर विक्री वाढत आहे. त्यामुळे कमी पातळीवरील व्याजदराचा या क्षेत्राला लाभ होईल असे नरडॅको या संस्थेचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता.
केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्याचे ठरविले आहे त्याचाही अप्रत्यक्षरीत्या या क्षेत्राला लाभ होणार आहे. अर्थसंकल्पामध्ये पोलादाच्या किमती कमी करण्यासंदर्भात काही उपाययोजना केल्या आहेत. या सर्वाचा एकत्रित परिणाम सकारात्मक राहील, असे त्यांनी सांगितले.
हाउसिंग डॉट कॉम व प्रॉपटायगर या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धुव अग्रवाल यांनी सांगितले की, महागाई आणखी हाताबाहेर गेलेले नाही. त्यामुळे या पतधोरणात व्याजदरात काही प्रमाणात कपात करण्याची शक्यता खुली होती. मात्र एकूणच वातावरण विकास दरासाठी पूरक असल्यामुळे त्याचा रिऍल्टी क्षेत्राला लाभ होऊ शकतो असे ते म्हणाले.
बॅंकर्सकडूनही स्वागत
अर्थसंकल्पापासून बॅंकांच्या शेअरच्या भावात वाढ होत आहे. आज रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेले पतधोरणही बॅंकांसाठी उपयुक्त आहे, असे स्टेट बॅंकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी सांगितले. रिझर्व्ह बॅंकेने रिटेल ग्राहकांना सरकारी रोखे उपलब्ध केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रिटेल ग्राहकांना गुंतवणुकीची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी सरकारला आकर्षक व्याजदरावर वापरता येतील आणि देशात भांडवल निर्मिती वाढेल असे ते म्हणाले.





