विविधा : डॉ. विजय भटकर

परम-10,000 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या संगणकाचे निर्माते, ब्रॉडब्रॅंड प्रणालीचे विकसक, डॉ. विजय पांडुरंग भटकर यांचे आज अभिष्टचिंतन. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1946 रोजी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील अडीचशे-तीनशे लोकवस्तीचे गाव मुरांबा येथे झाला.
भटकर यांचे शालेय शिक्षण मूर्तिजापूर येथे झाले. त्यांनी नागपूर येथील विश्वेश्वरय्या रीजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर वडोदरा येथील विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आयआयटी, दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना परदेशी नोकऱ्यांची अनेक आमंत्रणे आली होती; पण त्यांनी भारतातच राहायचे ठरवले. वर्ष 1968 मध्ये स्थापन झालेल्या विक्रम साराभाईंच्या अध्यक्षतेखालील इलेक्ट्रॉनिक्स कमिशनमधे भटकरांनी दहा वर्षे काम केले. इंदिरा गांधींनी नेमलेल्या महत्त्वाच्या “इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार’ समितीचे ते सदस्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेंद्रममध्ये इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट या भारतातील सर्वात मोठ्या प्रयोगशाळेची स्थापना झाली. ते या संस्थेचे 1980 ते 1987 या काळात संचालक होते.
भटकरांच्या मार्गदर्शनाखाली केरळमध्ये अठरा कारखाने उभारले गेले. 1982 च्या एशियाडच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे असे सरकारला वाटले. इतर ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या मते हे शक्य नव्हते, मात्र पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकरांवर सोपवली. त्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली केल्ट्रॉन आणि तिरुअनंतपूरमच्या इलेक्ट्रॉनिक्स संशोधन संस्थेने प्रयत्नांची पराकाष्ठा करून जबाबदारी पार पाडली. यावेळी भटकरांनी इलेक्ट्रॉनिक्सची अनेक उपकरणे व प्रणाल्या विकसित केल्या.
सुरक्षिततेच्या आणि उत्पादन क्षमतेच्या बाबतीत त्यांनी भिलाई प्लान्टमध्ये सुधारणा करून दिल्या. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण प्रणाली, उद्योगातील स्वयंचलित यंत्रणा, कलकत्ता भुयारी रेल्वेची संगणकीय प्रणाली त्यांनी विकसित केल्या. भटकर टाटा कन्सल्टन्सीत 1987 मध्ये उपाध्यक्ष झाले.
हवामानाच्या अंदाजाची अचूकता वाढवण्यासाठी भारताला महासंगणकाची गरज भासत होती. त्यासाठी भारताने अमेरिकेला महासंगणक देण्याची विनंती केली, परंतु ही विनंती अमेरिकेने नाकारली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारताने महासंगणकाचे तंत्रज्ञान विकसित करायला हवे, असे मत शास्त्रज्ञांसमोर मांडले. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखालील या प्रकल्पाची कार्यवाही भटकर यांच्यावर सोपवण्यात आली. वर्ष 1987 मधे डिसेंबर महिन्यात महासंगणक बनविण्याच्या कामाचा आराखडा तयार झाला. यासाठी लगेचच “सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्यूटिंग’ (सी-डॅक) या संस्थेची वर्ष 1988 मधे स्थापना करण्यात आली.
शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी “एज्युकेशन टू होम’ (ईटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी 1998-99 मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यांनी एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडब्रॅंड प्रणाली विकसित केली. त्यांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या. त्यांनी 12 हून अधिक पुस्तके आणि 80 तांत्रिक आणि संशोधन पत्रांचे लेखन आणि संपादन केले आहे.
अनेक विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभ, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदा, अधिवेशने आणि सार्वजनिक कार्यक्रमांना संबोधित केले आहे. भारत सरकारच्या “पद्मभूषण’, “पद्मश्री’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


