राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
पुणे – राज्यात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत आपण अनेक सुधारणा करीत पुढे गेलो आहोत. सुरुवातीला केवळ दोन चाचणी केंद्र होते. मात्र, आज 80 पेक्षा अधिक चाचणी केंद्र उभारण्यात आली असून, लवकरच ही संख्या 100च्या पुढे जाईल. राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत असून, ही लढाई जिंकण्यासाठी संपूर्ण जगात लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या “कोविड आरोग्य केंद्रा’चे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
करोना विरुध्दच्या लढाईत आपल्याला यश येत आहे. सुरुवातीला आपल्याकडे 350 आयसोलेशन बेड होते. मात्र, आज आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त सर्व बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.





