समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा!

मुंबई – नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. या आधी देखील छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक 3 सेंमी रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या होत्या. त्यानंतर माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर या भेगा बुजवण्यात आल्या होत्या. मात्र, आता त्यांच्या दोन महिन्यांच्या आतच पुन्हा एकदा समृद्धी महामार्गाला भेगा पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
वास्तविक समृद्धी महामार्गासाठी एम-40 ग्रेडचे सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता. त्यांचा हा दावा आता फोल ठरला आहे. माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला होता, त्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा या महामार्गावर भेगा पडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, माळीवाडा इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला होता, त्यामुळे अपघाताची शक्यता होती.
महामार्ग लवकरच पूर्णपणे खुला –
समृद्धी महामार्ग एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. तर, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हा संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, अद्याप तशी घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच 76 किलोमीटरचा टप्पा खुला करण्यात येईल. 2024 पर्यंत समृद्धी महामार्ग खुला होणार आहे. मुंबई ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी 16-20 तास लागत होते. मात्र, समृद्धी महामार्गामुळे हे अंतर 7-8 तासांत पूर्ण होणार आहे.





