कोविड लसीमुळे हृदयविकार नाही; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावाही चुकीचा

पुणे/ नवी दिल्ली – इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्स (आयसीएमआर) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या दोन्ही कंपन्यांनी कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो, हे वास्तव नाकारले आहे.
कर्नाटकातील हासनमध्ये गेल्या काही दिवसांत २२ हून अधिक २० ते ४५ वयोगटातील तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोविड लसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे कर्नाटक सरकार चिंतेत पडले आहे. याप्रकरणी सिद्धरामय्या यांनी या प्रकारणाची चौकशी करण्याचे आणि तज्ञांच्या उच्चस्तरीय समितीला १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
आयसीएमआर आणि एम्सच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की, भारतातील अचानक होणाऱ्या मृत्यूंचा आणि कोविड-१९ लसीचा थेट संबंध नाही. देशात दिली जाणारी कोविड-१९ लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. फार कमी प्रकरणांमध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत.
या अभ्यासात असे आढळून आले आहे की, अनुवांशिक उत्परिवर्तनामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अभ्यास अजूनही सुरू आहे आणि तो पूर्ण झाल्यानंतरच अहवाल सार्वजनिक केला जाईल. सरकारने इशारा दिला की, लसीसंदर्भात केले जात असलेले दावे निराधार आहेत आणि त्यामुळे सामान्य लोकांचा करोना लसीवरील विश्वास कमकुवत होईल. लसीमुळेच साथीच्या काळात लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत.
असा झाला पहिला अभ्यास…
पहिला अभ्यास आयसीएमआरच्या राष्ट्रीय महामारी विज्ञान संस्थेने (एनआयई) मे ते ऑगस्ट २०२३ दरम्यान केला होता. हा अभ्यास देशातील १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४७ प्रमुख रुग्णालयांमध्ये करण्यात आला होता. यामध्ये, अशा लोकांची माहिती गोळा करण्यात आली होती, जे पूर्वी निरोगी दिसत होते परंतु ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान अचानक मृत्युमुखी पडले. अभ्यासाच्या निकालांवरून स्पष्ट होते की, कोविड-१९ लस घेतल्याने अचानक मृत्यूचा धोका वाढलेला नाही.
असा झाला दुसरा अभ्यास
दुसरा अभ्यास एम्स, नवी दिल्ली करत आहे. यामध्ये, मृत्यूच्या कारणांचा प्रत्यक्ष तपास केला जात आहे. सुरुवातीच्या अहवालांमध्ये असे आढळून आले आहे की, या वयोगटातील बहुतेक मृत्यू हृदयविकारामुळे होतात. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून, हे देखील स्पष्ट झाले आहे की, मागील वर्षांच्या तुलनेत मृत्यूच्या कारणांमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. अनेक प्रकरणांमध्ये, काही अनुवांशिक विकार मृत्यूचे कारण असू शकतात, असेही आढळून आले.
काय आहे निष्कर्ष?
या दोन्ही अभ्यासांमुळे हे समजून घेण्यास मदत झाली आहे की, भारतातील तरुणांच्या अचानक मृत्यूसाठी आधीच अस्तित्वात असलेले आजार, अनुवांशिक कारणे आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली जबाबदार आहे. त्यामध्ये कोविड लसीचा संबंध नाही. हासन जिल्ह्यात एका महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने २२ हून अधिक तरुणांच्या अचानक मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. पण तरिही हा प्रश्न उरतोच की, सर्वासामान्य प्रकृती असलेल्या घटकांमध्ये कोविडची लस घेतल्यानंतरच अस्वस्थपणा कसा आला? याबाबत लसीचे निर्मातेही मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकारची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वाढत आहे.





