इम्रान खान व त्यांच्या पत्नीला न्यायालयाचा झटका; ‘ती’ याचिका कोर्टाने फेटाळली

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांचे अवैध निकाहाचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात आपल्याला झालेली शिक्षा स्थगित केली जावी अशी मागणी करणारी याचिका या दोघांकडून न्यायालयात दाखल करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या दोघांना ३ फेब्रुवारी रोजी ५ लाख दंड आणि सात वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अफजल मजोका यांच्या न्यायालयात मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली होती व न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी झाल्यावर इम्रान आणि त्यांच्या पत्नीच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या. सध्या ते रावळपींडीच्या आदियाला तुरूंगात आहेत. ७१ वर्षीय इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांसह अनेक गुन्हे दाखल आहेत व त्यांचे खटलेही सुरू आहेत तर त्यांच्या ४९ वर्षीय पत्नी बुशरा यांनाही अनेक आरोपांखाली अनेक खटल्यांचा सामना करावा लागतो आहे.
इद्दतच्या नावाने हा खटला ओळखला जात असून बुशरा यांचे पूर्वीचे पती खावर मनेका यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये या दोघांविरूध्द खटला दाखल केला होता. इद्दतचा अनिवार्य प्रतिक्षा कालावधी पूर्ण न करताच बुशरा यांच्याशी निकाह करण्यात आल्याचा आरोप त्यांनी इम्रान यांच्यावर ठेवला आहे व हा विवाह अवैध घोषित करावा अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.





