बोगस बंगाली डॉक्टरला न्यायालयाचा दणका; सुनावणी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे – वैद्यकीय पदवी अथवा पदविका नसताना प्रॅक्टीस करणाऱ्या बोगस डॉक्टरला न्यायालयाने दणका दिला आहे. २ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल.व्ही.श्रीखंडे यांनी सुनावली. आरोपी मुळचा पश्चिम बंगाल येथील आहे. दंड न भरल्यास त्याला १५ दिवस अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
मिलनकुमार अमर ठाकुर (वय ३४, रा. धानोरी, मूळ. पश्चिम बंगाल) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत २० ऑगस्ट २०१४ रोजी विश्रांतवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा उमेश गलांडे ऊर्फ डॉ. रेखा लबडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सायली ठोकळ यांनी काम पाहिले. त्यांनी परिश्रम घेत डे डू डे युक्तीवाद केला.
सहाय्यक पोलीस फौजदार पाटील यांनी तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार कोळप आणि शिपाई घोडेकर यांनी मदत केली. मोहिमेतंगर्त फिर्यादी बोगस डॉक्टरचा शोध घेत होत्या. त्यावेळी ठाकुरकडे अॅलोपॅथीची कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना औषधांचा साठा आढळून आला.
बीईएमएस व्यावसायिकांना डॉक्टर उपाधी लावण्याचा अधिकार नसताना, त्याच्याकडे लेटर पॅड व डॉक्टर उपाधीचा शिक्का आढळून आला. त्याद्वारे तो व्यवसाय करत असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसंनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.





