Nitesh Rane : ‘त्या’ प्रकरणात नीतेश राणेंना कोर्टाचा मोठा दिलासा

Nitesh Rane – महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांना 2017 मधील एका चर्चित प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तत्कालीन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर मासे फेकल्याच्या आरोपातून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
या प्रकरणात अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शींनी न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, मासे नेमके कुणी फेकले हे त्यांनी पाहिले नाही. त्यामुळे पुराव्याअभावी राणे यांच्यासह इतर आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. कोर्टाने दिलेल्या या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत.
21 मे रोजी सिंधुदुर्गातील अतिरिक्त सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने बेकायदेशीर जमाव करणे, गुन्हेगारी बळाचा वापर, हल्ला करणे तसेच कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला दुखापत पोहोचवणे या गंभीर आरोपांतून नितेश राणे आणि इतर 30 जणांची निर्दोष मुक्तता केली.
या निर्णयाचा सविस्तर आदेश मागील आठवड्यात सार्वजनिक करण्यात आला. या निकालामुळे नितेश राणेंना कायदेशीरदृष्ट्या मोठा दिलासा मिळाला असून, राजकीयदृष्ट्या देखील त्यांना या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे.





