Pimpri : निसर्गरम्य ठिकाणी प्री-वेडींग शूट काढण्याकडे जोडप्यांचा कल

कान्हे : तुळशी विवाह आटोपल्यापासून आपल्याकडे लग्नसराईचे सनई- चौघडे वाजू लागल्याचे चित्र दिसत आहे. लग्न सोहळ्यातील प्रत्येक क्षण आयुष्यभर जपून ठेवावा, यासाठी फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग केले जाते. अलीकडच्या काळात लग्न सोहळ्यापूर्वी प्री-वेडींग फोटो शूट करण्याची क्रेझ वाढली आहे. यात ग्रामीण भागातील निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्री-वेडींग शूट केले जात आहे. शहरासह ग्रामीण भागाकडेही प्री-वेडींगचे हे लोन पसरु लागले आहे.
मावळ तालुक्यातील पवन मावळ, आंदर मावळ अशा निसर्गरम्य ठिकाणी वधू-वरांचे लग्नापूर्वीचे फोटो काढण्यासह व्हिडिओ शूटिंग करण्याासाठी पसंती दिली जात आहे. यामुळे विवाह सोहळे अधिक हायटेक आणि खर्चिक होऊ लागल्याचे पाहायला मिळत आहेत.
पूर्वी लग्नात साध्या पद्धतीने फोटो, व्हिडिओ शूटिंग केले जात होते. परंतु हल्ली कलात्मक फोटोग्राफी आणि फिल्मी अंदाजामधील शूटिंग काढण्यावर भर दिला जात आहे. मागील काही वर्षांपासून प्री-वेडींग फोटोग्राफी, आकर्षक अल्बम काढण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यासाठी महागडे कॅमेरे वापरले जातात. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही प्री-वेडींगची मागणी होत आहे.
– नीरज वाघवले, फोटोग्राफर, कामशेत
कोरोना महामारीच्या काळात विवाह सोहळ्यांवर खर्च केले जाणाऱ्या पैशांची रक्कम कमी झाली होती. परंतु जसजसा कोरोनाचा प्रभाव ओसरला तसतसा पुन्हा एकदा विवाह सोहळे हे खर्चिक होत आहेत. त्यात प्री वेडींग सारख्या गोष्टींची भर पडत आहे. प्री वेडींग फोटोशूट ही आजकाल प्रत्येक लग्नाची जणू गरज आहे. लग्नाआधीचे खास दिवस खरोखर खास होण्यासाठी जवळपास सर्वच जोडपे लग्नाआधीच्या फोटोशूटचा अवलंब करत आहेत.
प्री वेडींग शूटचा वाढता ट्रेंड
सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. त्यामध्येच प्री वेडींग फोटोशूट हा विषय सध्या चर्चेत आहे. आपलेही सेलिब्रिटींप्रमाणे फोटोशूट व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, ही इच्छा लग्नसमारंभामध्ये पूर्ण केली जाते. त्यातही प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी वेगवेगळ्या थीम ठरवून फोटो शूट केले जाते.





