स्थायी सदस्यांच्या निवडीवरून नगरसेवकांत खदखद

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील 8 सदस्यांची 20 फेब्रुवारी होणारी नियुक्ती पुढे ढकलण्यात आली होती. ही नियुक्ती बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे. इच्छुकांची संख्या अन् गटतट यामुळे भाजपच्या सदस्यांमधील खदखद आणि धाकधूक वाढल्याचे दिसून आले. संधी कोणाला द्यायची यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. या बैठकीत सदस्यांच्या निवडीसोबत अध्यक्षपदाच्या निवडीचीही खलबते रंगल्याचे सांगण्यात आले.
स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्यासह आठ सदस्यांचा कार्यकाळ येत्या 29 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन नवीन सदस्यांना स्थायीमध्ये संधी मिळणार आहे. स्थायी समितीची संधी कोणाला मिळणार हे निश्चित न झाल्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली. तर तीन वर्षांमध्ये एकही पद न मिळालेल्या भाजपाच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे.
2017 मध्ये भाजपाची महापालिकेवर एकहाती सत्ता आली. तीन वर्षांच्या कालावधीमध्ये दोन्ही आमदार समर्थकांना महत्त्वाची पदे भूषविण्याची संधी मिळाली. मात्र पक्षनिष्ठेला महत्त्व न मिळाल्यामुळे अनेकांना पदाच्या संधीपासून दूर रहावे लागले. काही ठराविक नगरसेवकांना एकापेक्षा अधिक पदांवर काम करण्याची संधी मिळाली. तर अनेकांना एकही पद मिळाले नाही. महापालिकेत दोन आमदारांशिवाय पानही हलत नाही. स्था
दोन सदस्यांच्या नावावरून गोंधळ
स्थायी समितीसाठी सहा सदस्यांची नावे 20 फेब्रुवारी रोजीच प्रदेश भाजपाकडून पाठविण्यात आली होती. मात्र यामध्ये दोन सदस्यांची अनपेक्षितपने वर्णी प्रदेश पातळीवरुन लावली होती. या सदस्यांना स्थानिक नेत्यांचा विरोध असल्यामुळे गुरुवारी (दि. 20) झालेली सभा तहकूब करण्यात आली होती. प्रदेशकडून आमदारांची मर्जी राखण्यासाठी ही नावे बदलली जाणार की कायम ठेवली जाणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
शीतल शिंदे यांचे नाव आघाडीवर?
स्थायी समितीच्या सदस्यपदावरून भाजपामध्ये सुरू असलेला कलह अध्यक्ष निवडीपर्यंत कायम राहणार आहे. सत्तेच्या वाटपानुसार स्थायीचे अध्यक्षपद यावेळी भोसरीकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र गतवेळी नगरसेवक शीतल शिंदे यांनी माघार घ्यावी, यासाठी पुढील वर्षी संधी देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता हे आश्वासन पाळले जाणार की पुन्हा शिंदे यांना डावलले जाणार हे देखील निश्चित होणार आहे.
राष्ट्रवादीकडून महिला सदस्य
राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन वर्षामध्ये स्थायी सदस्य पदासाठी महिला व पुरुष नगरसेवकांना समान संधी दिली आहे. मागील वर्षात नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, यांच्यानंतर मयूर कलाटे, पंकज भालेकर यांना संधी देण्यात आली. यावेळी गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर यांच्या जागी महिला नगरसेविकांनाच स्थान दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





