Cotton price hike : कपड्यांच्या दरात मोठी वाढ होणार? सूती धागा 60% महाग; सणासुदीत कपडे 20% पर्यंत महागण्याची शक्यता
Cotton price hike : कापूस आणि सूती धाग्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यार्न 60% महागल्याने सणासुदीत कपड्यांच्या किमती 20% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

Cotton price hike : यंदाच्या सणासुदीच्या काळात कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कापूस आणि सूती धाग्याच्या (Cotton Yarn) दरात मोठी वाढ झाली असून, यार्नच्या किमती तब्बल 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
कापसाचे दरही 28 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीत गारमेंट्सच्या किमती 5 ते 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता उद्योग क्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे.
सूती धागा 250 रुपयांवरून 400 रुपयांवर –
परिधान निर्यात संवर्धन परिषद (AEPC)च्या माहितीनुसार, 2026 च्या सुरुवातीला सुमारे 250 रुपये किलो असलेला सूती धागा आता जवळपास 400 रुपये किलोवर पोहोचला आहे. म्हणजेच त्याच्या दरात सुमारे 60 टक्के वाढ झाली आहे. कच्चा माल आणि इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे वस्त्रोद्योगावरील दबाव आणखी वाढला आहे.
कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारात शंकर ICC-150, 28 काउंट कापसाचा दर आता 19,065 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. वर्षभरापूर्वी हा दर 14,875 रुपये प्रति क्विंटल होता.
कापसाची आवक घटली, साठेबाजीची शक्यता –
AEPCच्या मते, जिनिंग मिलांकडे कापसाचा साठा मर्यादित आहे. त्यातच बाजारातील आवक कमी झाल्याने कापड गिरण्यांची भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) लिलावांवरील अवलंबित्व वाढले आहे.
कापसाचा मोठा हिस्सा शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे गेल्याने बाजारात साठेबाजी आणि सट्टेबाजी वाढण्याची शक्यता आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये भारताचे कापूस उत्पादन 352.48 लाख गाठी होते. 2025-26 मध्ये ते 290.91 लाख गाठी राहण्याचा अंदाज आहे.
चालू हंगामात आंतरराष्ट्रीय कापसाच्या किमतीत सुमारे 19 टक्के, तर देशांतर्गत S-6 कापसाच्या किमतीत सुमारे 18 टक्के वाढ झाली आहे.
यार्न निर्यातीवर नियंत्रणाची मागणी –
सूती धाग्याच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी वस्त्रोद्योगाने सरकारकडे यार्न निर्यातीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. AEPCचे अध्यक्ष ए. शक्तिवेल यांनी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून 20 काउंट आणि त्यापेक्षा अधिक काउंटच्या सूती धाग्याच्या निर्यातीवर योग्य ती मर्यादा आणण्याची मागणी केली आहे.
उद्योगाच्या मते, यार्नच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय वस्त्रोद्योगाची जागतिक बाजारातील स्पर्धात्मकता कमी होऊ शकते.
कापूस-धाग्याऐवजी तयार कपड्यांच्या निर्यातीवर भर –
AEPCने कच्च्या कापसाची किंमत सुमारे 275 रुपये किलो, तर त्यापासून धागा तयार केल्यानंतर किंमत सुमारे 325 रुपये किलो असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मूल्यवर्धन करून तयार गारमेंटची किंमत 800 ते 1,200 रुपये किलोपर्यंत पोहोचते.
त्यामुळे भारताने कच्चा कापूस किंवा धागा निर्यात करण्याऐवजी अधिक मूल्यवर्धित तयार कपड्यांच्या निर्यातीवर भर द्यावा, अशी उद्योगाची भूमिका आहे. यामुळे देशात अधिक मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते.
कापूस उत्पादनात घट होण्याची भीती –
यंदा मान्सूनमधील सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि बियाणे पेरणीला झालेला विलंब यामुळे कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) परदेशी कृषी सेवेनुसार, 2026-27 हंगामात भारतात कापसाची लागवड सुमारे 115 लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. उत्पादन 245 लाख गाठी राहण्याचा अंदाज असून, एका गाठीचे वजन 480 पौंड आहे.
कापसाच्या सरासरी उत्पादकतेत 2 टक्के घट होऊन ती 464 किलो प्रति हेक्टरपर्यंत येण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबरमध्ये देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कापसाच्या पुरवठ्यावर आणखी दबाव येऊन कपड्यांच्या किमती वाढू शकतात.





