Cosmos Bank : कॉसमॉस बँकेचा दक्षिण भारतात विस्तार; नोव्हेंबरअखेर 200 शाखांचे लक्ष्य
Cosmos Bank : कॉसमॉस बँकेने तेलंगणात दोन नवीन शाखा सुरू केल्या. दक्षिण भारतातील विस्तारासाठी कोईमतूर, चेन्नईसह सहा शहरांची निवड; नोव्हेंबरअखेर २०० शाखांचे लक्ष्य.

Cosmos Bank : कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेने तेलंगणा राज्यातील हनमकोंडा-वारांगळ आणि एल. बी. नगर-हैदराबाद येथे दोन नवीन शाखा सुरू केल्या आहेत. वारांगळ येथील शाखेचे उद्घाटन बँकेचे संचालक अजित गिजरे यांच्या हस्ते झाले. ही बँकेची १९४ वी शाखा आहे.
एल. बी. नगर, हैदराबाद येथील बँकेच्या १९५ व्या शाखेचे उद्घाटन अध्यक्ष सचिन आपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी तेलंगणाचे पोलिस महासंचालक महेश भागवत उपस्थित होते. नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आपटे यांनी सांगितले की, तेलंगणा राज्यात आता कॉसमॉस बँकेच्या एकूण सात शाखा झाल्या आहेत.
दक्षिण भारतात बँकेचा शाखाविस्तार मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. यामध्ये कोईमतूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, हुबळी, चेन्नई आणि तिरुपूर या शहरांचा समावेश आहे. नोव्हेंबर २०२६ अखेर बँकेच्या एकूण शाखांची संख्या २०० करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आपटे यांनी सांगितले. दक्षिण भारताप्रमाणेच कोकणातही बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
नवीन शाखांच्या उद्घाटनप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सीए डॉ. यशवंत कासार, ज्येष्ठ संचालक ॲड. प्रल्हाद कोकरे, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे, दक्षिण विभागाचे उपमुख्य महाव्यवस्थापक उमेश बेल्हे यांच्यासह बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





