डबल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचारही डबल, जनतेला नवीन इंजिन सरकार पाहिजे – अरविंद केजरीवाल

बंगळुरू – आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की भाजपचे नेते नेहमी प्रचारात डबल इंजिन सरकारचे आवाहन करीत असतात. पण येथे कर्नाटकात डबल इंजिन सरकारच्या काळात विकासऐवजी भ्रष्टाचारच डबल झाला.
भाजप आमदाराच्या मुलाच्या घरात आठ कोटी पेक्षा अधिक रकमेच्या नोटा आढळल्या. त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही पण मनिष सिसोदियांच्या घरात काहीही न सापडताही त्यांना अटक केली गेली आहे. कर्नाटकातील सरकार चाळीस टक्क्यांचे कमिशन सरकार आहे. या राज्यात आता डबल इंजिन सरकार नको तर पुर्ण नवीन इंजिन सरकार हवे आहे. संपुर्ण भ्रष्टाचार मुक्तीसाठी आम आदमी पक्षाला येथे निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
कर्नाटकात भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या 82 वर्षीय कंत्राटदाराला अटक केली जाते पण त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्या मंत्री किंवा भाजप आमदारांपैकी कोणालाहीं अटक केली जात नाही असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. ते म्हणाले की अलिकडेच अमित शहा कर्नाटकात आले होते. त्यांनी येथे बोलताना भ्रष्टाचार मुक्त सरकारसाठी कर्नाटकात पुर्ण बहुमताचे भाजपचे सरकार निवडून देण्याचे आवाहन केले. नंतर कोणी तरी त्यांना आठवण करून दिली की कर्नाटकात भाजपचेच पुर्ण बहुमताचे सरकार आहे. असे असताना गेल्या चार वर्षात आपण भ्रष्टाचार मुक्ती का करू शकला नाहीत असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले की पंजाबात आमच्या पक्षाच्या एका मंत्र्याने आणि एका आमदाराने भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता आम्ही त्यांना लगेचच जेल मध्ये टाकले आहे. भ्रष्टाचाराच्या संबंधात झिरो टॉलरन्स असे आमचा धोरण आहे. आम्ही भ्रष्टाचाराला जराही दयामाया दाखवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, मोफीत वीज, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था आम्हीच देऊ शकतो त्यामुळे लोकांनी आम आदमी पक्षाला येथे निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.





