सातकरस्थळ येथील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार? उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

राजगुरूनगर – सातकरस्थळ (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकारी खेड यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी दिले आहेत. सातकरस्थळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मारुती चिमाजी सातकर यांनी सातकरस्थळ ता खेड ग्रामपंचायतींमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याबाबत चौकशी करण्याची मागणी 22 जुलै रोजी विभागीय आयुक्तांकडे केली होती.
मुद्रांक शुल्क कामात अनियमितता, ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या चिंचपटा येथे बंदिस्त गटार करण्यासाठी 14 लाख 14 हजार 592 रुपये खर्च केले; मात्र त्याचे अंतर किती याबाबत चौकशी, पाणी योजनेची मुख्य पाइपलाइन ते नवीन टाकीपर्यंत पाइपलाइन किती किलोमीटर केली.
2 लाख 25 हजार 793 रुपये एवढा जास्त खर्च कसा झाला. सिद्वेश्वर सोसायटी ते बोंबले घरापर्यंतचा रस्ता कॉंक्रीटीकरण अंतर कमीखर्च जास्त यात अनियमितता, आठ दिवसांत क्लासिक वॉटर क्लिनिकसाठी सात दिवसाच्या अंतरावर 30 हजार रुपये टाक्या करण्याचा खर्चात भ्रष्टाचार, पाणी पुरवठा मोटर दुरुस्ती जादा खर्च, ग्रामपंचायतीच्या मेन फंडातून झालेला खर्चात कोणतीही बिले जोडलेली नसणे, कार्यालयीन खर्च 2 लाख 68 हजार 236 व रस्ता दुरुस्तीसाठी 2 लाख 9 हजार 287 रुपये खर्च दाखवला आहे.
रस्ता नवीन केला की जुना दुरुस्त केला, याबाबत तफावत असल्याचे मारुती सातकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. देखभाल दुरुती खर्च 2022-23 वर्षात 3 लाख 2 हजार 558 खर्च झाला आहे, तो जास्त असल्याने त्याचे रेकॉर्ड दाखवले जात नाही. आदी 21 बाबींची चौकशी करावी, अशी मागणी पुण्याचे आयुक्त यांच्याकडे केली होती.
माजी सरपंच सातकर यांच्या तक्रारअर्जाची विभागीय आयुक्तांनी दखल घेत जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विजयसिंह नलावडे यांनी खेडचे गटविकास अधिकारी यांना तक्रार अर्जातील मुद्द्यांवर कार्यवाही, तक्रारींचे अनुषंगाने चौकशी व कार्यवाही करावी व तक्रारींचे निवारण करावे असे आदेश दि 26 सप्टेंबर 2023 च्या पत्राद्वारे दिले आहेत.
पंचावार्षिक निवडणूक जाहीर
सातकरस्थळ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यातच आता हे भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या विविध कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असल्याने यावेळीच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा कळीची ठरणार आहे. तथापि या प्रकरणाचा चेंडू गटविकास अधिकाऱ्यांच्या कोर्टात गेल्याने त्याला ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक कसे सामोरे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





