Shirur : लाचखोर हवालदार दीड महिन्यानंतर गजाआड
Shirur : शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात मुंढे याने स्वतःसाठी तसेच वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

शिरूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात 95 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर पथकाला चकवा देऊन पसार झालेला शिरूर पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश नाथराव मुंढे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. तब्बल दीड महिन्यापासून फरार असलेल्या मुंढेला सोमवारी (दि. 16) सकाळी साडेअकराच्या सुमारास एसीबीच्या पुणे पथकाने शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक केली. न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (दि. 20) पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे शिरूरमधील गाजलेल्या लाचखोरी प्रकरणाला पुन्हा वेग आला असून, मुंढेने लाच मागताना उल्लेख केलेल्या वरिष्ठ अधिकार्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात मुंढे याने स्वतःसाठी तसेच वरिष्ठांसाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 रोजी टाकळी हाजी पोलीस चौकीत पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी एक लाख रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर 95 हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. टाकळी हाजी पोलीस चौकीत मुंढे याने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 95 हजार रुपयांची लाच स्वीकारली. मात्र, एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच लाचेची रक्कम आणि तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन त्याने तेथून पलायन केले. एसीबीच्या सापळ्यात लाच स्वीकारल्यानंतरच आरोपी पसार झाल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेपासून मुंढे फरार होता. एसीबीचे पथक त्याचा शोध घेत होते. अखेर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी शोधमोहीम राबवून त्याला शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
वरिष्ठांचीही चौकशी होणार का?
एसीबीच्या पडताळणीत हवालदार सतीश मुंढे याने स्वतःसाठी तसेच वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला एक लाख आणि तडजोडीनंतर 95 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मुंढे याने नेमक्या कोणत्या वरिष्ठ अधिकार्यांच्या नावाने लाचेची मागणी केली? लाचेची रक्कम वरिष्ठांपर्यंत पोहोचणार होती का? या व्यवहारात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. केवळ लाच स्वीकारणार्या हवालदाराच्या अटकेपुरतीच कारवाई मर्यादित राहणार की वरिष्ठांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी होणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.





