मुंबई : उद्योग क्षेत्राला कर्ज पुरवठा वाढवा यासाठी रिझर्व बँक आणि अर्थ मंत्रालय प्रयत्न करीत असतानाच उद्योगांना होत असलेल्या कर्ज पुरवठ्यात घट झाली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी संपलेल्या पंधरवड्यामध्ये बँकांनी उद्योगांना केलेला कर्ज पुरवठा केवळ 4.9 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत हा कर्ज पुरवठा 8.9 टक्क्यांनी वाढला होता. याचा अर्थ सध्या उद्योग कमी भांडवलाचा वापर करीत असल्याचे दिसून येते. देशातील महत्त्वाच्या 41 शेडूल्ड बँकांनी केलेल्या कर्ज पुरवठ्याची आकडेवारी संकलित करून ही माहिती जारी करण्यात आली. यामध्ये जवळजवळ 95% बँकांचा समावेश आहे. त्यामुळे यातून एकूण कर्ज पुरवठ्याचे चित्र स्पष्ट होते. एकूण बिगर खाद्य कर्जपुरवठा वार्षिक पातळीवर केवळ 9.8% नी वाढला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 16.2% इतके होते. उद्योगाचा कर्जपुरवठा तर केवळ 4.9% नी वाढला आहे यामध्ये सर्व अभियांत्रिकी उद्योग बांधकाम रबर प्लास्टिक आणि तत्सम उद्योगाचा समावेश केला जातो. बँकांकडून बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपन्यांना होणारा कर्जपुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे सेवा क्षेत्राच्या कर्ज पुरवठ्यातही घट होऊन हा कर्ज पुरवठा 9.4 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण 20.7% होते. फक्त सॉफ्टवेअर क्षेत्राला दिल्या जाणार असलेल्या कर्ज पुरवठ्यात वाढ झाली आहे. इतर सर्वच क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी बँकांच्या प्रमुखाशी चर्चा करून सर्वच क्षेत्रांना कर्ज पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न करावा. विशेषत: कमकुवत गटांना कर्ज पुरवठा वाढवावा अशा सूचना दिल्या आहेत. कृषी क्षेत्राचा कर्जपुरवठा मंदावला या कालावधीत फक्त उद्योग क्षेत्राचा कर्ज पुरवठा मंदावलेला नाही तर कृषी क्षेत्राच्या कर्जपरवठ्यावरही नकारात्मक परिणाम झाला आहे. 30 मे रोजी संपलेल्या पंधरवड्यात कृषी क्षेत्राचा कर्जपुरवठा वार्षिक पातळीवर केवळ 7.5 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी या कालावधीत हा कर्ज पुरवठा 21.6 टक्क्यांनी वाढला होता. त्यामुळे कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकर्यांना कर्जाची गरज लागणार असल्याचे समजले जाते.