CoronaVaccine : “डिसेंबर 2021 पर्यंत सर्व देशाचे लसीकरण पूर्ण करू”

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लसीकरणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकार दिशाहीन असल्याची टीका केल्यानंतर केंद्र सरकार तत्परतेने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आले. त्यानुसार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना केंद्र सरकार येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण देशाचे कोविड लसीकरणाचे काम पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे.
देशातील लसीकरणाच्या संबंधातील पहिलेच ठोस विधान केंद्र सरकारच्या वतीने यानिमित्त करण्यात आले आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आतापर्यंत केवळ तीन टक्के इतकेच लसीकरण झाले असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी कॉंग्रेसशासित राज्यांतील लसीकरणाकडे लक्ष द्यावे, कॉंग्रेसशासित राज्यांमध्येच लसीकरणाच्या संबंधात घोळ सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अनेक बिगर भाजपशासित राज्यांतील सरकारांनी केंद्राकडून पुरेसा लसींचा साठा येत नसल्याची टीका सुरू केली आहे. केंद्राकडून होणाऱ्या अपुऱ्या लसी पुरवठ्यामुळे अनेक राज्यांमधील 18 ते 45 वयोगटातील लोकांचे लसीकरण थांबले आहे.
त्यावर जावडेकरांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, संपूर्ण देशाची लसीकरण प्रक्रिया डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे ठोस विधान त्यांनी केले आहे.





