करोनाचा नवीन विषाणू नोव्हेंबर पासून जर्मनीत

बर्लिन – ब्रिटन मध्ये करोनाच्या ज्या नवीन विषाणुने थैमान घातले आहे तो विषाणु नोव्हेंबर महिन्यातच जर्मनीत आढळून आला होता असे त्या देशातील वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्या विषाणुचा रूग्ण उत्तर जर्मनीत मरण पावला आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
करोनाच्या या नवीन विषाणुचे नाव बी 1.1.7. असे आहे. आणि याच विषाणुने सध्या ब्रिटन मध्ये थैमान घातले आहे. जर्मनीत ज्या व्यक्तीला या विषाणुची नोव्हेंबर महिन्यात लागण झाली होती ते वृद्ध गृहस्थ होते. त्यांच्या पत्नीलाही त्यांच्या पासून याची लागण झाली आहे पण त्या मात्र बचावल्या असून त्या आता बऱ्या झाल्या आहेत असे जर्मतील संबंधीतांनी म्हटले आहे.
या दाम्पत्याची मुलगी ब्रिटन मध्ये राहते. ती नोव्हेंबरच्या सुमारालाच ब्रिटनहून घरी आली होती. तिच्यापासूनच या विषाणुंचा त्यांना प्रसार झाला असावा असा तेथील वैद्यकीय तज्ज्ञांचा कयास आहे. सुदैवाने जर्मनीत या नवीन विषाणुचा मोठा प्रादुर्भाव होऊ शकलेला नाही. सध्या या नवीन विषाणुची एकच महिला रूग्ण जर्मनीत आहे.





