डेहराडून – उत्तराखंडमध्ये गेल्या दहा दिवसांत एक हजारपेक्षा अधिक बालके करोनाच्या दुसऱ्या लटेत बाधित झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारी दिली. यातील काही बालकांची प्रकृती ढासळत असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी दोन हजार 131 मुलांना करोनाचा संसर्ग झाला होता. तर या वर्षी एक ते 15 एप्रिल दरम्यान 264 तर 16 ते 30 एप्रिल दरम्याम 1,053 आणि एक मे ते 14 मे दरम्यान 1,618 जण बाधित झाले, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. राज्यात सध्या प्रती लाख 771 सक्रीय बाधित असून त्यांची संख्या उत्तर प्रदेशच्या तुलनेत सातपट अधिक आहे, अशी माहिती सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्यनिटीजचे अध्यक्ष अनूप नौतीयाल यांनी दिली. ते म्हणाले, वेगाने बाधितांची आणि मृतांची संख्या वाढत आहे तरीही अद्याप चाचण्या वाढवण्यात अपयशी ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये 79 हजार 379 सक्रीय बाधित आहेत. त्यात चार हजार 426 जणांचा मृत्यू झाला आहे.