CoronaFight : राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी; शरद पवारांच्या सूचना

मुंबई – देशावर करोना संसर्गाचे मोठे संकट घोंगावत आहे. देशभरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालये अपुरी पडत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. महाराष्ट्रात देखील ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना सूचना केल्या आहेत.
राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती तसेच त्याचा पुरवठा करावा, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. वसंतदादा शुगर इस्टिट्यूटकडून याबाबत सर्व साखर कारखान्यांना पत्र देण्यात आलं आहे. सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजन उभारणीचे प्रकल्प हातात घ्यावेत. ऑक्सिजन प्रकल्पाला वाफ आणि वीजेची गरज भासते. साखर कारखाने सुरू असताना वाफ आणि वीज उपलब्ध होते. त्यामुळे कारखान्यांना ऑक्सिजन प्रकल्प उभा करायला कमी खर्च लागेल, असं शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.
ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे अशा कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. यासाठी कारखान्यांना सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल तसेच खर्चसुद्धा कमी होईल, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.





