करोना क्वारंटाइनसाठी शाळांचा वापर करणार

कर्नाटक सरकारचा निर्णय
बंगळुरू – करोनाचा धोका वाढला तर शाळा आणि त्यांच्या हॉस्टेल्सचा उपयोग या संशयित रुग्णांच्या क्वारंटाइनसाठी करण्याची सूचना कर्नाटक सरकारने केली आहे. राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांचा त्यासाठी वापर करण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा जिल्हा प्रशासन कोणतीही शाळा किंवा त्यांची हॉस्टेल्स वापरू शकेल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांनी यांनी दिली आहे.
कर्नाटकात 55 जणांना करोनाची लागण झाली असून त्यातील दोन रुग्ण दगावले आहेत. करजोल यांनी सांगितले की, सध्या शाळा बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या वसतिगृहात राहणारे विद्यार्थीही घरी गेल्याने त्या इमारती या रुग्णांसाठी वापरता येऊ शकतील. या शाळांच्या वर्गात अथवा हॉस्टेल्समध्ये आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.





