परदेशांतून आलेल्या १३ जणांना करोना

स्थानिक पातळीवर संसर्ग झालेली तब्बल 902 प्रकरणे : स्मार्ट सिटीची निरीक्षणे
– सुनील राऊत
पुणे – शहरात करोनाग्रस्तांचा आकडा हजारावर गेला आहे. त्यावर आता या संसर्गाबद्दल महापालिकेचा आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीकडून विश्लेषण करण्यात येत आहे. शहरात 9 मार्च ते 24 एप्रिलपर्यंत परदेशांतून आलेल्या 13 जणांना लागण झाली असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. तर करोना बाधितांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या 65 जणांना, तर तब्बल 902 जणांना करोना बाधितांशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क आल्याने या आजाराची लागण झाली आहे.
स्मार्ट सिटीने दिलेल्या माहितीनुसार, शहरात 9 मार्च रोजी पहिला करोनाबाधीत रुग्ण आढळला होता. त्यानंतर 24 एप्रिलपर्यंत सुमारे 980 जणांना या आजाराची लागण, तर 71 जणांचे मृत्यू झाले. हा विषाणू चीनमधून जगभर पसरला होता. त्यामुळे परदेशांतून आलेल्या करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने या साथीचा प्रसार सुरू झाला.
परदेशांतून पुण्यात आलेले 13 जण करोनाबाधित झालेले आहेत. त्यात सर्वाधिक सहा रुग्ण दुबईवरून आलेले असून 3 अमेरिका, 1 इंग्लंड, तर अन्य 3 इतर देशांतून आलेले आहेत. अशा रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले तसेच त्यानंतर बाधित झालेल्यांच्या थेट संपर्कात सुमारे 65 जणांना या आजाराची बाधा झाली आहे. त्यानंतर या साथीचा प्रसार वाढून करोनासदृश लक्षणे आढळल्याने थेट रुग्णालयात आलेले, पालिकेच्या फ्लू क्लिनिकमध्ये संशयित म्हणून आलेल्या 902 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सुरूवातीच्या कालावधीनंतर स्थानिक पातळीवरच शहराच्या काही भागातबाधित वाढले असून, त्या भागात हा स्थानिक संसर्ग पसरलेला असल्याचे चित्र आहे.
वस्त्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण
या विश्लेषणानुसार, “स्थानिक पातळीवर संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये सुमारे 70 टक्के रुग्ण वस्त्यांमधील आहेत. त्या भागात दाट लोकवस्ती, लहान घरे आणि एकाच घरात दहा ते बारा व्यक्ती राहात असल्याने हा संसर्ग अधिक पसरला आहे. त्यामुळे ज्या भागात बाधित सापडत आहेत, तेथील संबंधितांना लगेच संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. तर दुसरीकडे आसपासच्या घरांमध्ये ही साथ पसरू नये, म्हणून या नागरिकांच्या घरातील गर्दी कमी करण्यासाठी पालिकेच्या शाळा, समाज मंदिरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.







