कोरोनाचा पु्न्हा शिरकाव..! मुंबईपाठोपाठ पुण्यातही आढळला पहिला रुग्ण; 87 वर्षीय पुरुष रुग्णाला कोरोनाची लागण

Corona patient found in Pune : सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांत येथील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. अशातच आता मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे ५७ रुग्ण सक्रिय असून यापैकी एक रुग्ण पुण्यात आढळला आहे. यामुळे आता मुंबईनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव पुण्यात झाला आहे.
शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 87 वर्षीय पुरुषाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आलं आहे. यंदाच्या वर्षातील पुण्यातील हा पहिलाच रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे, असे असले तरी वैद्यकीय तज्ज्ञांचे मते घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणू सध्याच्या सौम्य स्वरुपाचा उपप्रकार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू आणि केरळमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य मंत्रिमंडळाची सकाळी ११.३० वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने याविषयी चर्चा होऊन निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय या बैठकीत राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे झालेले नुकसान आणि त्यांना मदत करण्यासंदर्भातही निर्णय होण्याची शक्यता आहे.
आरोग्य विभागाकडून चाचण्या
सोमवारी आरोग्य विभागाकडून ४६ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या १५ होती, तर रॅडिड चाचण्यांची संख्या ३१ होती. २०२४ मध्ये ४ लाख ८४ हजार कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५ हजार ५२८ रुग्णांचे अहवाल कोरोना पॅाझिटिव्ह आले, त्यापैकी ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. मात्र, यावर्षी जानेवारी ते मे या महिन्यात कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.





