धानोरेतील उद्योजकाच्या घरातील पाच जणांना कोरोनाची लागण

शिक्रापूर – शिरर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना आता धानोरे व दरेकरवाडी येथे प्रथमच कोरोणाचा शिरकाव होऊन दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत धानोरे येथील एका बड्या उद्योजकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असताना आता त्या उद्योजकाच्या घरातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.
धानोरे ता. शिरूर या गावाने कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविलेले असताना धानोरे या गावामध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला असून येथील एका बड्या उद्योजकास काही त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वतः तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यांनतर त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते, सदर परिसरातील कोरोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण करत धानोरे येथील सदर उद्योजकाच्या घरातील नऊ व्यक्तींचे स्व्याब तपासणीसाठी पाठविले असता आज त्या व्यक्तींचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून नऊ जणांपैकी पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले तर चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे, मात्र पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्यामुळे धानोरे गावातील कोरोना बाधितांची संख्या सहा
झाली आहे, मात्र अनेक दिवसांनंतर गावामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन एकाच घरातील सहा जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले असून धानोरे येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती काढण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे असून नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





