महसुलालाही करोना ‘बाधा’

गतवर्षीच्या तुलनेत नोंदणी विभागाचे उत्पन्न तब्बल 9 हजार कोटींनी घटले
– गणेश आंग्रे
पुणे – दरवर्षी स्वत:च्याच वसुलीचे विक्रम रचणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यंदा मात्र करोना परिस्थितीचा फटका बसला आहे. गतवर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या कालावधीत 14 हजार 613 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता तो यावर्षी फक्त 5 हजार 511 कोटी रुपये जमा झाला आहे. यात तब्बल 9 हजार 102 कोटी रुपयांची तूट आली आहे. एवढा कमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाल्याने त्याचा परिणाम थेट विकासकामांवर होणार आहे.
जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध होणाऱ्या करांच्या नोंदणीतून नोंदणी विभागाकडे कर जमा होतो.
राज्यातील शहरांसह लगतच्या गावांतही नागरिकरण वाढत असल्याने खरेदी-विक्री व्यवहारातून मोठा महसूल जमा होतो.
यंदा, मात्र लॉकडाऊननंतर मे आणि जून महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालये सुरु झाली. या कालावधीत करोनाचा मोठा फटका नोंदणी विभागाला बसला. राज्यात मागील सहा महिन्यात 6 लाख 99 हजार 583 दस्त नोंदणी झाली असून गतवर्षी या कालावधीत 14 लाख 85 हजार 9103 दस्त नोंदणी झाली होती. सुमारे 7 लाख 86 हजारने दस्तनोंदणी कमी झाली आहे. यामुळे नोंदणी विभागाच्या पदरी निराशा पडली असून अपेक्षित महसूल जमा झाला नाही, असे प्रशासनाने सांगितले.
विकासकामांसाठी निधी नाही….
शासन प्रत्येक विभागाला महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देते. या उद्दिष्टांच्या पूर्तीतून शासनाला महसूल मिळतो. हा महसूल शासन विविध विकास कामांवर खर्च करते. राज्याला महसूल मिळवून देणारा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग हा दुसऱ्या क्रमांकाचा विभाग आहे. जमा होणाऱ्या महसूलाच्या आकडेवारीवरूनच कोणत्या कामांसाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा याचा निर्णय होत असतो. यंदा मात्र करोना परिस्थितीमुळे महसूल कमी जमा झाल्याने विकामकामांना निधी मिळण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.






