‘ईएसआय’ हॉस्पिटलमध्येही करोनावर उपचार

पुणे – बिबवेवाडी येथील “ईएसआय’ हॉस्पिटल येथेही करोनाग्रस्तांवर उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयाला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी सोमवारी पाहणी केली. केंद्रीय कामगार कल्याण विभागाच्यावतीने हे रुग्णालय उभारण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, डॉ. सुनील जगताप आदी उपस्थित होते. राम आणि विक्रम कुमार यांनी येथील सोयी-सुविधांची पाहणी करून काही त्रुटींची पूर्तता करण्याबाबत सूचना केली.
कोविड रुग्णालय गतीने उभे करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन राम यांनी यावेळी दिले. येथे कोविड रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या रुग्णालयाची 100 खाटांची क्षमता तसेच अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर्स सुविधाही उभारली जाणार असल्याचे आमदार मिसाळ यांनी सांगितले.





