दत्तवाडी, दांडेकर पूल भागातही करोनाचा शिरकाव

दोघे पॉझिटिव्ह सापडल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली
पुणे – शहरात वस्त्यांमध्ये करोनाचा प्रसार वाढला आहे. त्यात भवानी पेठ, कळस, धानोरी तसेच नगर रस्ता आणि मध्यवस्ती भागाचा समावेश असतानाच आता दांडेकर पूल आणि दत्तवाडी परिसरात करोनाने शिरकाव केला आहे. एका बड्या मॉलमध्ये कामास असलेल्या एका व्यक्तीस करोनाची लागण झाल्याचे 2 दिवसांपूर्वी समोर आले होते. त्या व्यक्तीच्या संपर्कातील हे दोन्ही नवीन रुग्ण आहेत. तर हे दोन्ही रुग्ण राहत असलेला परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
गेल्या 3 आठवड्यांपासून शहरात करोना बधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. प्रामुख्याने दाट लोकवस्ती असलेल्या कसबा पेठ परिसर, भवानी पेठ, घोरपडे पेठ, येरवडा तसेच कळस धानोरीचा वस्ती परिसर, गुलटेकडी, पर्वती दर्शन या भागात रुग्ण वाढत आहेत. विशेषतः वस्तीमध्ये या आजाराचा शिरकाव होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत होती. मात्र, मॉलमध्ये कार्यरत असलेले हे दोघे जण बाधित असल्याने या भागातही करोनाचा शिरकाव झाला आहे. इतर वस्त्यांप्रमाणे या भागातही लोकसंख्या घनता अधिक असल्याने चिंता वाढली आहे.
क्लोज कॉन्टॅक्टचे तातडीने विलगीकरण
दरम्यान, दत्तवाडी आणि दांडेकर पूल परिसरात राहायला असलेल्या या दोन्ही रुग्णांच्या घरातील व्यक्ती तसेच क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या सर्वांचे बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी विलगीकरण करण्यात आले आहे. त्यांचे घशातील द्रवाचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्या सर्वांना पालिकेच्या विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे. तसेच हा भाग पोलिसांनी सील केला असून या भागातील नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये. तसेच सर्दी, ताप, खोकला, धाप लागणे अशी लक्षणे असल्यास तातडीने फ्लू सेंटरमध्ये तपासणीस यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.





