करोनाचा सोने खरेदीला फटका; देशात केवळ ५० किलो सोने आयात

नवी दिल्ली : भारतीय लोकं आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. मात्र मागील महिन्याभरामध्ये सोनं खरेदीकडे भारतीयांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. मात्र एप्रिलमध्ये भारतात केवळ ५० किलो सोनं आयात झाले आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारतामध्ये ११०.१८ टन सोने आयात झाले होते असे रॉयर्टर्सने म्हटले आहे. मागील तीन दशकांमधील सोने आयातीचा हा निच्चांक आहे.
किंमतीच्या आधारावर सांगायचे झाल्यास एप्रिल महिन्यात भारतामध्ये २.४८ मिलियन डॉलर सोन्याची आयात झाली असल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. मागील वर्षी आयात करण्यात आलेल्या सोन्याची किंमत ३.९७ अरब डॉलर इथकी होती. सध्या देशामध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रती ग्रॅम भाग ४४ हजार ५६० रुपये इतका आहे.
२५ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे देशभरामध्ये अनेक सेवा बंद करण्यात आल्या. यामध्ये मॉल, चित्रपटगृहे, लग्नाचे हॉल यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळेच ऐन लग्न समारंभाच्या कालावधीमध्ये लॉकडाउन सुरु झाल्याने याचा फटका अनेकांना बसला.
अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली. त्यामुळेच सोन्याची मागणी घटली. मात्र याचवेळी शेअर बाजारामध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली नाही.





