दौंड तालुक्याला कोरोनाने घेरले…

दौंड : शहरात राज्य राखीव पोलीस दलातील सात जणांना व शहरातील एका लहान मुलीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.
दौंड शहरात मागील काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 मध्ये आत्तापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता मात्र मंगळवारी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने राज्य राखीव पोलीस दलाच्या 5 गटामध्ये खळबळ उडाली आहे. तर राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 7 च्या 6 जवानांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरातील दत्त मंदिरालगत असणाऱ्या एका कुटुंबातील अनेकांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरातील एका 7 वर्षीय मुलीला ही करोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात सामोर आले आहे. यापूर्वी तिच्या कुटुंबातील 13 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मागील अनेक दिवसांपासून दहिटणे येथील एक रुग्ण वगळता एकही रुग्ण ग्रामीण भागात आढळला नव्हता. मात्र रविवारी (दि. 14) खुटबाव येथील तरकारी मालाची वाहतूक करणाऱ्या चालकास करोनाची लागण झाली होती त्याच्या संपर्कात असणाऱ्यांची तपासणी केली असता त्याचा खुटबाव येथील 27 वर्षीय मित्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत ईरवाडकर यांनी दिली.
दरम्यान दौंड तालुक्यातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 36 झाली आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5 मधील 1, राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 7 मधील 14 तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्या 2 आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून खुटबाव येथे सोमवार (दि. 15) पासून पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी पुन्हा करोना बाधित रुग्ण आढळल्याने खुटबाव ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.





