करडे MIDCतील तांब्या चोरीचं जाळं उद्ध्वस्त; दोघे जेरबंद, शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे MIDC परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांना शिरूर पोलिसांनी अखेर आळा घातला आहे. GPLD इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या स्टोन क्रशर प्लांटमधून चोरी गेलेल्या १५० एम.एम क्षमतेच्या १८ मीटर लांबीच्या केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
त्यांच्याकडून तब्बल ३६ हजार रुपयांची केबल वायर आणि चोरीसाठी वापरलेली एमएच १४ ईपी ३३०८ क्रमांकाची एर्टिगा गाडी जप्त केली आहे. तसेच चौकशीत आरोपींनी आणखी एका गुन्ह्याची कबुली देत १ लाख २५ हजार ६२० रुपयांचे कॉपर ट्यूब बंडल हे देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास न्हावरे, गट नं. ८५०/३ येथील GPLD इंफ्रा कंपनीच्या स्टोन क्रशर प्लांटमधील मोटारीला जोडलेली १८ मीटर लांबीची केबल अज्ञात चोरट्यांनी कापून पळवली होती. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ७६५/२०२५, कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
करडे MIDC परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अशाच प्रकारचे तांब्याच्या तारा चोरीचे अनेक गुन्हे घडत होते. या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने पाहत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथक गठित केले. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील CCTV फूटेजच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवले.
पुरावे जमा होताच तपास पथकाने संशयितांना ताब्यात घेतले असता विशाल मारूती सुर्यतळ (२४ वर्षे), प्रशांत ध्रुपद सुर्यतळ (२७ वर्षे) (दोघेही रा. गोळेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून १ लाख २५ हजार ६२० रुपये किंमतीचे कॉपर ट्यूब बंडल आरोपींकडून जप्त केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सागर शेळके, राजेंद्र बनकर,सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोते,पोलीस अमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, अजय पाटील या पथकाने कौशल्यपूर्ण तपास, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे केवळ मोठा मुद्देमालच जप्त केला नाही तर MIDC परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्यांचे जाळे उध्वस्त केले आहे.
या मोठ्या कारवाईमुळे करडे MIDC परिसरातील वारंवार होणाऱ्या तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलिसांच्या या तडाखेबाज कारवाईचे स्थानिक उद्योग क्षेत्राकडून कौतुक होत आहे.





