लसीच्या वाहतुकीसाठी कूल-एक्सचे ट्र्क सज्ज; पुण्यातून देशाच्या कानाकोपऱ्यात ‘अशी’ पोचणार लस…

पुणे – गतवर्षी चीनमध्ये उगम पावलेल्या करोना विषाणूने अवघ्या जगास मेटाकुटीस आणलंय. अतिशय संसर्गजन्य असलेला हा जीवघेणा विषाणू आल्यानंतर सर्वांनाच अनेक बंधने पाळावी लागत आहेत. यामुळेच कधी एकदा करोना प्रतिबंधक लस येते आणि आपण यातून मुक्त होतो याकडेच अवघ्या मानव जातीचे लक्ष लागून राहिलंय. अशातच भारताने दोन करोना लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली असून येत्या १६ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होणार आहे.
दरम्यान, लसीकरण १६ जानेवारीपासून सुरु करण्यात येईल असं सरकारने स्पष्ट केलं असलं तरी देशभरात लसीची वाहतूक कशी होणार? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट येथून देशाच्या कोणत्याही भागात लस पोचवण्याचे काम पुण्यातील ‘कूल-एक्स’ या कंपनीला देण्यात आलंय.
याबाबत माहिती देताना कूल एक्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल अग्रवाल यांनी, “गेल्या महिनाभरापासून याबाबतची तयारी सुरु असून आता आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्हाला देशाच्या कोणत्याही भागात लस पोचवण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आलेलं. लस वाहतुकीसाठी आमच्याकडे ३००-३५० ट्र्क तयार आहेत, गरज पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून आणखी ५००-६०० ट्र्क तयार केले जाऊ शकतात. आदेश भेटल्यानंतर ३ ते ४ तासांमध्ये आम्ही कंटेनरमध्ये लस लोड करू शकतो.” अशी माहिती दिली.
‘कूल-एक्स गेल्या १२ वर्षांपासून तापमान नियंत्रित वाहतूक व्यवसायात कार्यरत आहे. आमच्या ट्रकमध्ये उणे २५ डिग्री सेल्सियस ते २५ डिग्री सेल्सियस तापमान नियंत्रित केलं जाऊ शकतं. अनेक राज्यसरकारांनी लस वाहतूक करताना ट्र्कला पोलीस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं म्हटलंय.’ अशी माहिती कंपनीचे संचालक कुणाल अग्रवाल यांनी दिली.





