पारंपरिकरित्या बांधणी केलेले जहाज नौदलात दाखल होणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या वतीने उद्या कारवार इथल्या नौदल तळावर प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून बांधलेल्या जहाजाला समारंभपूर्वक आपल्या ताफ्यात दाखल केले जाणार आहे. या समारंभातच या जहाजाच्या नावाचेही अनावरण केले जाणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत हे या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून, ते या समारंभाचे अध्यक्षस्थानही भूषवतील. त्यांच्या हस्तेच हे जहाज औपचारिकपणे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील केले जाणार आहे.
प्राचीन शिलाई तंत्राचा वापर करून बांधलेले हे जहाज, अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावरून प्रेरणा घेत साकारलेली पाचव्या शतकातील एका जहाजाची प्रतिकृती आहे. जुलै २०२३ मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि मेसर्स होडी इनोव्हेशन्स यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानंतर, या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात झाली होती. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने आर्थिक पाठबळ पुरवले होते. या जहाजाच्या प्रत्यक्ष बांधणीची मुहूर्तमेढ १२ सप्टेंबर २०२३ रोजी झाली होती.
प्राचीन शिलाई तंत्राचा वापर असलेल्या या जहाजाची, संपूर्ण बांधणी पारंपरिक पद्धतीने आणि परंपरागत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करूनच केली गेली आहे. केरळमधील आघाडीचे जहाज बांधणी कारागीर बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखालील कारागिरांच्या हजारो हातांनी शिलाई तंत्राचा वापर करून जहाजाच्या सांध्यांची बांधणी केली आहे. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये गोव्यातील मेसर्स होडी शिपयार्डमध्ये या जहाजाचे जलावतरण केले गेले होते.
हे जहाज नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर, या प्रकल्पाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्याअंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने या जहाजाच्या पारंपरिक सागरी व्यापारी मार्गांवरून महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक सागरी सफरीचा प्रारंभ केला जाईल. या जहाजाच्या पहिल्या वहिल्या सागरी सफरीअंतर्गत गुजरातपासून ते ओमानपर्यंतची आंतरमहासागरीय सफरीची तयारी नौदलाने सुरू केली आहे.





