Chhatrapati Sambhajinagar : विसर्जनाच्या दिवशी आरतीवरून वाद? छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगली चर्चा! संस्थान गणपतीची आरती सुरू झाली अन्…

Chhatrapati Sambhajinagar : राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या दहा दिवसांपासून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे सेवा करणाऱ्या गणेश भक्तांसाठी आजचा क्षण निरोपचा आहे. एकीकडे गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आरतीवरून दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा रंगली आहे.
शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या संस्थान गणपतीच्या आरतीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात वाद झाला असल्याची चर्चा शहरात होत आहे. पुण्यात मानाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर इतर मंडळ्याच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर शहरातील इतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते.
संस्थान गणपतीची आरती पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित पार पडली. पण गणपतीची आरती सुरू झाली. त्यावेळी चंद्रकांत खैरे यांच्या हातात आरतीचं ताट होतं. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
शिरसाट यांनी ‘तुम्हीच घ्या आरती’ असं खैरेंना म्हणत संताप व्यक्त केला. फार काही पुढे न झाल्यानं आरती सुरळीत पार पडली. पण या दोन नेत्याच्या आरतीवरून झालेल्या वादाची जोरदार चर्चा केली जात आहे. आरती सुरळीत पार पडल्यानंतर आलेल्या सर्व नेत्यांचा सत्कार करण्यात आला.
मात्र, चंद्रकात खैरे यांचा सत्कार करण्यात न आल्याने अपमानाचा बदला घेतल्याची चर्चा रंगली आहे. खरंतर शहरातील मोठी ख्याती असलेल्या संस्थान गणपतीच्या आरतीला आजच्या दिवशी विशेष महत्व असतं. त्यामुळे या आरतीकडे शहरवासींचा लक्ष असतं. यात आरतीच्या कार्यक्रमात दोन नेत्यांमधील नाराजी आणि संतापाच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या घटनेवर दोन्ही नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दोघांमध्ये वाद झाल्याची जोरदार चर्चा केली जात आहे.





