Janhvi Kapoor : बोल्ड सीनवरून वाद, आता व्हायरल चॅट्सची चर्चा; पेद्दीच्या सेटवर नेमकं काय घडलं?
Janhvi Kapoor : हे स्क्रीनशॉट्स अभिनेत्रीच्या फॅन क्लबकडून शेअर करण्यात आले असून, त्यामध्ये जान्हवीने चित्रपटातील काही विशिष्ट कॅमेरा अँगल्सबाबत आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.

Janhvi Kapoor : राम चरण आणि जान्हवी कपूर यांचा ‘पेद्दी’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असून अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने तब्बल 100 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मात्र, चित्रपटाच्या यशासोबतच जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून आणि तिच्या वेशभूषेवरून निर्माण झालेला वादही चांगलाच चर्चेत आहे.
चित्रपटात जान्हवी कपूरला अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजात सादर करण्यात आल्याने काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर टीकेची लाट उसळल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली होती. मात्र, त्यानंतरही हा वाद शांत झालेला नाही.
आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून जान्हवी कपूरचे कथित चॅटचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे स्क्रीनशॉट्स अभिनेत्रीच्या फॅन क्लबकडून शेअर करण्यात आले असून, त्यामध्ये जान्हवीने चित्रपटातील काही विशिष्ट कॅमेरा अँगल्सबाबत आक्षेप घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा : Delhi Court: भाजपच्या नेत्याची आमदारकी जाणार? महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी दोषी ठरवल्याने बसणार दणका
व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉट्सनुसार, जान्हवीने शूटिंगदरम्यान तिच्या छाती आणि कंबरेवर केंद्रित शॉट्स न घेण्याची विनंती केली होती. तसेच, अभिनेता राम चरण यांनीही तिच्या बाजूने हस्तक्षेप करत अशा प्रकारचे शॉट्स टाळण्यास सांगितल्याचा दावा या चॅटमध्ये करण्यात आला आहे.
कथित संभाषणात जान्हवीने राम चरण यांचे कौतुक करत, त्यांनी तिच्या भावना समजून घेतल्या आणि संबंधित बाबींवर नाराजी व्यक्त केल्याचे नमूद केले आहे. या चॅटमध्ये उल्लेख केलेली व्यक्ती दिग्दर्शक बुची बाबू सना असल्याचेही सांगितले जात आहे.
मात्र, हे स्क्रीनशॉट्स खरे आहेत की बनावट, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच जान्हवी कपूर किंवा चित्रपट निर्मात्यांकडूनही यासंदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
दरम्यान, ‘पेद्दी’मधील महिलांच्या चित्रणावरून सुरू झालेल्या चर्चेमुळे हा वाद आणखी गडद झाला असून, सोशल मीडियावर याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.





