राज्यसभेत खरगेंच्या ‘ठोकेंगे’च्या वक्तव्यावरून गोंधळ

नवी दिल्ली : मंगळवारी, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. खरंतर, दिग्विजय सिंह बोलत असताना खरगे त्यांच्या आसनावर उभे राहिले. यावर उपसभापती हरिवंश यांनी त्यांना अडवले. यावर खरगे म्हणाले, ही कोणत्या प्रकारची हुकूमशाही आहे? मी तुम्हाला हात जोडून बोलण्याची परवानगी मागत आहे.
यानंतर हरिवंश म्हणाले की, तुम्ही सकाळीच बोलला आहात. आता बोलण्याची वेळी दिग्विजय सिंह यांची आहे, म्हणून कृपया खाली बसा. यानंतर, खरगे म्हणाले, मी नक्कीच बोलेन, पण तुम्हाला जे काही ठोकायचे आहे ते आम्ही व्यवस्थित ठोकू, आम्ही सरकारलाही ठोकणार. हरिवंश यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला. तेव्हा ते म्हणाले की, आम्ही सरकारच्या धोरणांवर प्रहार करण्याबद्दल बोलत आहोत.
खरगे यांच्या विधानावर केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, विरोधी पक्षनेत्याकडून खुर्चीसाठी अशी भाषा कोणत्याही स्वरूपात स्वीकार्य नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी उपसभापती हरिवंश यांच्याकडे मागणी केली की असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावेत. अशी भाषा अत्यंत निंदनीय आहे आणि ती क्षमेला पात्र नाही. यानंतर, खरगे सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले की मी अध्यक्षांसाठी असे शब्द वापरले नाहीत. त्यांनी उपसभापतींना सांगितले की, जर तुम्हाला माझ्या बोलण्याने दुखावले असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो. मी सरकारच्या धोरणांसाठी ठोको हा शब्द वापरला आहे. मी सरकारची माफी मागणार नाही.
तृणमूल खासदाराच्या टिप्पणीनेही वादंग
अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या चर्चेत तृणमूल काँग्रेसच्या खासदाराच्या टिप्पणीवरूनही लोकसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग निर्माण झाला. तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी आज लोकसभेत मनरेगावर प्रश्न उपस्थित करत होते. यावेळी, त्यांनी बंगालला तीन वर्षांपासून मनरेगाच्या लाभांपासून का वंचित ठेवण्यात आले? असा प्रश्न विचारला. त्यानंतर सत्ताधारी पक्षनेते आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप करू लागले.
या चर्चेदरम्यान टोकाटोकी सुरू झाली, तेव्हा टीएमसी खासदाराने संतापत, हे मंत्री आहेत का? तुम्हाला कोणी मंत्री बनवले? अशी टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी मोठा गोंधळ घातला. संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्याच वेळी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही तृणमूल काँग्रेसच्या खासदाराला संयम राखण्यास सांगितले.





