Madhu Sapre: मिलिंद सोमणसोबतचं वादग्रस्त न्यूड फोटोशूट, १४ वर्षांची कोर्टाची लढाई; आता काय करते मधू सप्रे?
Madhu Sapre १९९२ मध्ये मधूने फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली. त्याच वर्षी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत तिसरं स्थान मिळवलं. त्या काळात ही भारतीय महिलेसाठी मोठी कामगिरी मानली जात होती. स्पर्धेदरम्यान दिलेल्या तिच्या प्रामाणिक उत्तरामुळेही ती चर्चेत आली होती. देशातील क्रीडा सुविधा सुधारण्याची गरज असल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं.

Madhu Sapre: १९९० च्या दशकातील भारतातील सर्वात लोकप्रिय सुपरमॉडेल्समध्ये मधू सप्रेचं नाव आवर्जून घेतलं जातं. मिस इंडिया किताब, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ओळख आणि यशस्वी मॉडेलिंग कारकीर्द यामुळे ती चर्चेत होती. मात्र, मिलिंद सोमणसोबत केलेल्या एका वादग्रस्त फोटोशूटमुळे तिच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं. त्या एका फोटोमुळे तिला तब्बल १४ वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागला. आज मात्र ती इटलीमध्ये मुलीसोबत शांत आयुष्य जगत आहे.
मधू सप्रेला सुरुवातीपासून मॉडेल व्हायचं नव्हतं. ती राष्ट्रीय स्तरावरील ॲथलीट होती. लहानपणापासूनच तिच्या वडिलांनी तिला क्रीडा प्रशिक्षण दिलं होतं. विविध स्पर्धांमध्ये तिने अनेक पदकंही जिंकली. एका पार्टीत प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर शांतनू शिओरे यांनी तिला पाहिलं आणि मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने पहिलं मॉडेलिंग असाइनमेंट केलं आणि तिच्या करिअरची सुरुवात झाली. (Madhu Sapre)
१९९२ मध्ये मधूने फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली. त्याच वर्षी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत तिसरं स्थान मिळवलं. त्या काळात ही भारतीय महिलेसाठी मोठी कामगिरी मानली जात होती. स्पर्धेदरम्यान दिलेल्या तिच्या प्रामाणिक उत्तरामुळेही ती चर्चेत आली होती. देशातील क्रीडा सुविधा सुधारण्याची गरज असल्याचं तिने स्पष्टपणे सांगितलं होतं. (Madhu Sapre)

Madhu Sapre: मिलिंद सोमणसोबतचं वादग्रस्त न्यूड फोटोशूट, १४ वर्षांची कोर्टाची लढाई; आता काय करते मधू सप्रे?
मात्र, १९९५ मध्ये मिलिंद सोमणसोबत टफ शूजच्या जाहिरातीसाठी केलेल्या न्यूड फोटोशूटने मोठा वाद निर्माण केला. या छायाचित्रात दोघांच्या अंगाभोवती अजगर गुंडाळलेला होता. या जाहिरातीवर अश्लीलतेचा आरोप झाला. तसेच वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचाही दावा करण्यात आला. या प्रकरणात मधू आणि मिलिंद यांना तब्बल १४ वर्षे न्यायालयीन लढा द्यावा लागला. अखेरीस दोघांचीही निर्दोष मुक्तता झाली. (Madhu Sapre)
या फोटोशूटबद्दल बोलताना मधूने अनेकदा सांगितलं की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा तिचा हेतू नव्हता. हा फोटो इतका वादग्रस्त ठरेल, याची कल्पनाही नव्हती. प्रसिद्धी किंवा पैशांसाठी तिने हे फोटोशूट केलं नव्हतं, असंही तिने स्पष्ट केलं. (Madhu Sapre)
या वादाचा तिच्या करिअरवर परिणाम झाला. काही कामं तिच्या हातून गेली. अनेक चित्रपटांच्या संधीही मिळाल्या, पण परिस्थितीमुळे त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. या काळात तिचं आणि मिलिंद सोमणचं नातंही तुटलं. दोघे लग्न करणार अशी चर्चा होती. मात्र, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
यानंतर मधूच्या आयुष्यात इटालियन उद्योगपती जियान मारिया एमेन्डाटोरी आले. २००१ मध्ये दोघांनी लग्न केलं आणि मधू इटलीत स्थायिक झाली. तिने काही काळ आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग सुरू ठेवलं. २००३ मध्ये ‘बूम’ चित्रपटातून अभिनयातही पदार्पण केलं. मात्र, हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही.
२०१० नंतर मधूने कामातून ब्रेक घेतला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर २०१२ मध्ये तिची मुलगी इंदिराचा जन्म झाला. त्यानंतर तिने करिअरपेक्षा मातृत्वाला अधिक महत्त्व दिलं. पुढे वडिलांचं निधन, भावाचा मृत्यू आणि घटस्फोट अशा अनेक कठीण प्रसंगांना तिला सामोरं जावं लागलं. तरीही ती खंबीरपणे उभी राहिली.
सध्या मधू सप्रे इटलीत मुलगी इंदिरासोबत राहते. मुलीच्या शिक्षणापासून क्रीडा उपक्रमांपर्यंत ती स्वतः लक्ष देते. घटस्फोटानंतरही मुलीच्या संगोपनासाठी तिचे आणि माजी पतीचे चांगले संबंध कायम आहेत. आजही मधू सांगते की, मिस इंडिया किताब, सुपरमॉडेल म्हणून मिळालेलं यश आणि प्रसिद्धीपेक्षा आई होणं हेच तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे.





