वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनास हातभार; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त नसरापूर वनविभागाचा उपक्रम

नसरापूर : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाने राबवलेला ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रम अधिक व्यापक बनवण्यासाठी यावर्षी १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नसरापूर वनविभाग आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी मिळून भव्य वृक्षारोपण उपक्रम राबवला.
हा उपक्रम मौजे इंगवली (फॉ.कं.नं. 421) व मौजे भांबवडे – दत्तगड (फॉ.कं.नं. 511) येथील अटल घन वन प्रकल्पांतर्गत घेण्यात आला. मियावाकी पद्धतीने सुमारे ९९,००० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून इंगवली येथे ६६,००० आणि दत्तगड येथे ३३,००० वृक्षांचे रोपण झाले.
जांभूळ, वड, पिंपळ, बहावा, कडुलिंब यांसारख्या स्थानिक आणि जैवविविधतेला पोषक अशा प्रजातींची निवड करण्यात आली आहे. हे वृक्ष भविष्यात परिसरात तापमान संतुलन, पाण्याचा साठा, जमिनीची गुणवत्ता व वन्यजीवांचे अधिवास निर्माण करण्यासाठी मोलाचे ठरणार आहेत.
कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी . वसंत चव्हाण, वनपाल श्रीमती पद्मिनी कांबळे, . संदीप जोशी, वनरक्षक . अवधूत गुजर व . तुषार कुंभार यांच्यासह वनविभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून वृक्षारोपण केले आणि स्व. वसंतराव नाईक यांना पर्यावरणपूरक अभिवादन केले.
स्व. वसंतराव नाईक: हरित क्रांतीचे खरे शिल्पकार
स्व. वसंतराव फुलाजी नाईक हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. १९६३ ते १९७५ या कालखंडात सलग १२ वर्षे मुख्यमंत्री राहून त्यांनी राज्याच्या ग्रामीण, कृषी आणि जलसंधारण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन योजनांचे विस्तार, जमीन सुधारणांवर भर आणि कृषी विद्यापीठांची स्थापना या त्यांच्या निर्णयांनी हरित क्रांतीला गती दिली.
त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्यामुळेच त्यांना ‘हरित क्रांतीचे जनक’ ही उपाधी मिळाली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने करण्यात आलेली ही वृक्षलागवड त्यांच्याच विचारांची आणि कार्याची आठवण करून देणारी ठरली.
पर्यावरणपूरक भविष्याची पायाभरणी
मियावाकी पद्धतीने तयार होणारी अटल घन वने परिसरात घनदाट, नैसर्गिक आणि जैवविविधतेने समृद्ध पर्यावरण प्रणाली तयार करणार आहेत. यातून फक्त हवा आणि पाण्याचे शुद्धीकरणच नाही, तर भविष्यातील पर्यावरण शिक्षण आणि पर्यटनासाठी देखील हि ठिकाणे उपयुक्त ठरतील.
राज्य शासनाच्या 10 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाला अशा प्रयत्नांमुळे नवी दिशा मिळत असून, सर्वसामान्यांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले.





