कराड -गेल्या दिड वर्षांपासून करोनाचे संक्रमण सुरु आहे. याचा सर्वावरच परिणाम झाला. कराड नगरपालिकेच्या तिजोरीवरही आर्थिक ताण पडला आहे. त्याची दखल घेवून नगरपालिकेत आर्थिक बचतीचे धोरण आखले जात आहे.
प्रत्येक विभाग प्रमुखांनी अनावश्यक खर्च टाळून पालिकेच्या आर्थिक बचतीला हातभार लावावा, अशी नोटीस पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे. पालिकेच्या नव्या कामांना मंजुरी घेताना निधी उपलब्धतेचा लेखा विभागाचा अहवाल घेण्यात यावा, अशीही श्री. डाके यांनी नोटीशीव्दारे सूचना केली आहे.
रमाकांत डाके यांनी पालिकेतील स्थिती लक्षात घेवून आर्थिक बचतीचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार पालिकेच्या प्रत्येक विभागाला नोटीस दिली आहे. त्यात म्हटले आहे की, कोविडच्या स्थितीमुळे पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण आला आहे. पालिकेच्या उत्पन्न व खर्चात मोठी तूट निर्माण झाली आहे.
त्यामुळे खर्चात कपात करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिका खालील उपाययोजना हाती घेत आहे. त्यात प्रत्येक विभागाने हातभार लावावा. पालिकेच्या दोन ते तीन विभागांनी एकत्रित जाहीरात द्यावी. दुसऱ्या विभागाचे काम पालिकेतर्फे करू नये. त्यासाठीचा खर्चही टाळावा. जितका खर्च कमी करता येईल, तेवढा खर्च कमी करावा. जेथे अत्यावश्यक आहे, तेथेच वीजेचे दिवे लावावेत. अनावश्यक दिवे बंद करावेत.
कर विभागाने जाहीरात कराचे पैसे वसूल करावेत. मागील थकबाकी भरलेली त्या सगळ्यांचे होर्डींग्ज जप्त करावेत. गाळ्यांच्या भाड्याची वसुली करावी. ज्या गाळ्यांची मुदत संपली आहे, मात्र ते थकीत आहेत. त्यांच्या गाळ्यांचे फेरलिलाव काढून गाळ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. कर विभागाने रिकाम्या जागांना कर लावला आहे का, त्याचा अहवाल द्यावा.
तो देताना अशा जागांना कर लावल्याने किती उत्पन्न वाढणार आहे, त्याचाही अहवाल द्यावा. अनाधिकृत मालमत्ता शोधून त्यांच्यावर कायदा कलम 189 (अ) प्रमाणे कर लावावा. त्याची दक्षता घेवून कार्यवाही करावी. कोणत्याही नवीन कामाला मंजुरी घेताना निधी आहे का, याचा विभागाकडून लेखी अहवाल घेवूनच ते काम मंजूरीसाठी द्यावे.
कराड नगरपालिकेच्या तिजोरीवर पडलेला आर्थिक ताण वाढतच आहे. उत्पन्न व खर्चात तूट झाल्याने पालिकेत सध्या आर्थिक बचतीचे धोरण आखले आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
रमाकांत डाके, मुख्याधिकारी,कराड नगरपरिषद कराड