पुणे जिल्हा | कृषी मूल्य साखळीतील घटकांमध्ये योगदान द्या

नारायणगाव, (वार्ताहर) – महिलांनी कृषी मूल्य साखळीतील विविध घटकांमध्ये योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी केले. सेंटर ऑफ एक्सेलेन्स संस्था कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि किसान कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत आयोजित भेंडी काढणी पश्चात व्यवस्थापन प्रशिक्षणात कोकरे बोलत होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख राहुल घाडगे, मॅग्नेट प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रकल्प अधिकारी सचिन खरमाळे, प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे विभागीय प्रकल्प अधिकारी अजय कुदळे, विषय विशेष तज्ज्ञ धनेश पडवळ, संतोष इंगोले, आदित्य माने आदी उपस्थित होते. प्रशिक्षणास राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदारांचे 48 प्रतिनिधी उपस्थित होते.
विनायक कोकरे यांनी मॅग्नेट प्रकल्पाचे फलोत्पादनातील महत्त्व आणि त्यातील विविध संधी यांवर मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त संस्था आणि महिलांनी प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच साठवणूक, प्रतवारी, पॅकिंग, विपणन, प्रक्रिया आणि मूल्य संवर्धन यासारख्या क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.प्रशिक्षणात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
अतिरिक्त प्रकल्प संचालक, डॉ. अमोल यादव यांनी मॅग्नेट प्रकल्पामधील नवीन व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानास 60 टक्के पर्यंत अनुदान, खेळते भांडवल व मध्य मुदत कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य मिळत असल्याने शेतकरी, उत्पादक संस्थानी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. बी. टी. पाटील व्हेजीटेबल ब्रीडर यांनी भेंडीचे मूल्य साखळी व्यवस्थापन व कीड व रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. नवनाथ गरुड यांनी भेंडी काढणी पश्चात हाताळणी व व्यवस्थापन पध्दती तसेच देशांतर्गत विपणन करताना आलेले अनुभव व आठवडी बाजार याबाबत अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल घाडगे, प्रस्तावना सचिन खरमाळे यांनी तर धनेश पडवळ यांनी आभार मानले.





