कमी पटसंख्येच्या शाळांना कंत्राटी शिक्षक

पुणे – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने महिनाभरापुर्वी एक पत्र काढून १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत शिक्षक नेमण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता राज्यभरात १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कंत्राटी शिक्षक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शाळांना नवे कंत्राटी शिक्षक मिळणार आहे.
शासनाच्या मान्यतेनुसार या शाळांमध्ये मानधन तत्वावर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यापूर्वी २० पटसंख्या किंवा त्यापेक्षा आत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एका कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्यात येणार होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करून आता १० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एक शिक्षक नियुक्त केला जाणार आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग कामाला लागले होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती.
सरकारने गाव तिथे शाळा हे धोरण राबविल्याने मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढली. मात्र विद्यार्थी संख्या कमी झाली. शहरालगतच्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली तशी विद्यार्थी संख्या देखील वाढली. त्यामुळे राज्यातील हजारो जिल्हा परिषदेच्या शाळांची पट संख्या घटली.
त्यानंतर आता या सर्व शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात अशा हजारो शाळा आहेत. त्यांच्यासाठी शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत शिक्षकांनी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.





