सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

मांडवगण फराटा -शिरूरच्या पूर्व भागातील इनामगाव तांदळी, गणेगाव दुमाला, मांडवगण फराटा, बाभूळसर बुद्रुक, सादलगाव या गावांत गेल्या आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या परिसरात ओला दुष्काळ पडला आहे. ही सर्व गावे नदीच्या काठावर असल्याने या भागात वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध असते. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी ऊस पीक धोक्यात येऊ लागले आहे.
या भागातील जमिनी चोपणाट झाल्याने शेतकरीवर्ग हा या भागात ऊस लागवड करतात. परंतु या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने या चोपण भागातील शेतकरी वर्गाला ऊस लागवड केलेली ऊस लागण ही पाण्यात गेल्याने पुन्हा ऊस लागवड करावी लागणार आहे. कारण ऊस बेणे पाण्यात सडल्याने ऊस उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला नांगरट, सरी काढणे, सरी ओढणे, ऊस बेणे विकत घेणे,
ऊस बेणे पाण्यात दाबणे, असा 20 ते 25 हजार रुपये खर्च एकरी पाण्यात गेल्याने शेतकरी वर्गाला हा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
शिरूरच्या पुर्व भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस पीक पाण्यात गेले आहे. त्यामुळे या परिसरात ऊस लागवड पाण्यात सडली आहे. यामुळे भागातील शेतकरी वर्गाला नव्याने ऊस लागवड करावी लागणार आहे. त्याचा मोठा फटका या भागातील शेतकरी वर्गाला बसला आहे.
– राजेंद्र दरेकर, शेतकरी मांडवगण फराटा





