Newasa News : शेतकरी संजय ठुबे व त्यांच्या कुटूंबियांच्या अटकेच्या विरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान – ॲड.अजीत काळे

नेवासा – विश्वविंड ते भेंडा (ता.नेवासा) येथील २२० के.व्ही.या अतिउच्च दाब वीज वाहिनी व मनोरा उभारणी कामाला विरोध करणाऱ्या सौंदाळा (ता.नेवासा) येथील शेतकरी संजय ठुबे व त्यांच्या कुटूंबियांना नेवासा पोलीसांनी केलेली अटकेची कारवाई ही अत्यंत दुर्देवी आहे. या संदर्भात संबंधित पोलीस आणि शासकिय यंञणा यांच्या विरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान केल्याप्रकरणी आपण याचिका दाखल करणार असल्याची माहीती शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजीत काळे यांनी दैनिक प्रभात’शी संवाद साधतांना दिली.
दैनिक प्रभात’शी संवाद साधतांना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे विधिज्ञ अजीत काळे यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,नेवासा पोलीसांनी या प्रकल्पाला विरोध करणारे शेतकरी संजय ठुबे व त्यांच्या कुटूंबियाला अटक करुन अन्याय केलेला असून शेतकऱ्यांच्या जमीनी पोलीस प्रशासनाचा वापर करुन हडपण्याचा प्रकार राजरोस सुरु असून येथून पुढे हा प्रकार सहन केला जाणार नाही असा परखड इशाराही यावेळी बोलतांना ॲड.अजीत काळे यांनी दिला.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की,विद्युत कलम कायदा (१०) प्रमाणे कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमीनीमध्ये विद्युत तारा ओढणे,मनोरे उभे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज असते सदर परवानगी देत असतांना जिल्हाधिकाऱ्यांवर कायदेशीर दायित्व आहे की, त्या संबंधित शेतकऱ्यांना नैसर्गिक न्यायतत्वाच्या आधारे नोटिस देवून सदर जमिनीमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई करुन मगच जमीनीमध्ये प्रवेश करण्याचे अधिकार दिले जात असतात.
सदर कायदा हा ब्रिटिश काळातील असून राज्य शासनाने सन २०१७/१८ मध्ये या संदर्भात अध्यादेश काढून या संदर्भात नियमावली ठरवलेली असून त्यामध्ये एक समितीही गठीत करुन त्या समितीस भू-संपादनाची नुकसान भरपाई ठरविण्याचे आधिकार देण्यात आल्याची माहीतीही यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि छञपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे विधिज्ञ ॲड.अजीत काळे यांनी दैनिक प्रभात’ला दिली.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीसांनी शेतकरी संजय ठुबे व त्यांच्या कुटूंबियांना सन २०१७/१८ या अध्यादेशाप्रमाणे ही कारवाई झालेली नसून शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई न देता पोलीस बळाचा वापर करुन येथील शेतकऱ्यांच्या शेतात अनाधिकृतपणे प्रवेश करुन संबंधित यंञणेने जे काम चालू केले आहे ते संपुर्णपणे बेकायदेशीर असून याचा शेतकरी संघटनेकडून जाहिर निषेद्ध केला जात असून संघटना ही शेतकरी ठुबे व त्यांच्या कुचूंबियांच्या पाठीशी भक्कमपणे ठाम उभी असल्याची माहीती यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड.अजीत काळे यांनी यावेळी दैनिक प्रभात’शी बोलताना दिली.
शेतकरी संजय ठुबे व त्यांच्या कुटूंबियांना झालेली अटक ही पुर्णपणे बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अर्निशकुमार व इतर खटल्यांमध्ये दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणारी असून संबंधित पोलीस अधिकारी व शासकिय यंञणा यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहीती ॲड. अजीत काळे यांनी दैनिक प्रभात’शी संवाद साधताना दिली.





