Contaminated Water: नळातून पाणी की आजार? भिगवणमधील दूषित पाणीपुरवठ्यावर नागरिकांचा संताप
Contaminated Water: गेल्या काही दिवसांपासून नळांना गाळयुक्त, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी; गॅस्ट्रो, डायरिया आणि जलजन्य आजारांच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली.

Contaminated Water – गावात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नळांना पिवळसर, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, पोटाचे विकार आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी अनेकांना जारचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. जलवाहिन्यांमध्ये गळती अथवा पाणीपुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे गाळयुक्त आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्र
शासनाकडून केवळ ‘दुरुस्ती सुरू आहे’ असे सांगण्यात येत असल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने संपूर्ण जलवाहिनीची तपासणी करून दूषित पाणीपुरवठ्याचे मूळ कारण शोधावे, फुटलेल्या अथवा गळती झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
प्रशासनाची भूमिका
याबाबत ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनी सांगितले की, डीकसळ येथून थेट नदीपात्रातून पाणी उचलले जात असल्याने पाणी गढूळ येत असावे. पाण्याच्या गुणवत्तेसाठी टीसीएलसह आवश्यक उपाययोजना करता येतील का, याची पाहणी केली जात आहे.





