Contaminated Water : रेल्वे स्थानकांवरील पाणी दूषित; कॅगच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर
रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह (Contaminated Water) मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

Contaminated Water : रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह (Contaminated Water) मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
या तपासणीत अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्या असून अनेक रेल्वे स्थानकांतील पाणी हे दूषित (Contaminated Water) आहे, असे या अहवालात म्हटले आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या या अहवालात देशातील ५१२ रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.
देशातील काही रेल्वे स्थानकांतील पाण्यामध्ये मानवी विष्ठेत आढळणारे ई-कोलाय जीवाणू आढळले आहेत. रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर आणि नळांमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नमुन्यांच्या तपासणीत टोटल कोलिफॉर्म्स जीवाणू आढळले असून यात ई-कोलायचाही समावेश आहे.
ई-कोलायच्या काही प्रकारामुळे अन्नातून विषबाधा, अतिसार आणि गंभीर परिस्थितीत मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या उद्भवू शकते. कॅगने देशभरातील विविध रेल्वे विभागांमधील ४१२ बिगर-उपनगरीय स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा आढावा घेतला.
या तपासणीत दक्षिण रेल्वेच्या कोईम्बतूर आणि पालक्काड, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भिवंडी रोड, कल्याण, लोणावळा आणि पूर्व रेल्वेच्या मधुपूर या स्थानकांमधील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाब समोर आली आहे.
एनएसजी-१ श्रेणीतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), कोलकात्यातील हावडा आणि सियालदह तसेच नवी दिल्ली या प्रसिद्ध रेल्वे स्थानकांतसुद्धा काही मूलभूत सुविधांची कमतरता आढळली आहे असे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या स्थानकांवर बसण्याची व्यवस्था, कचरापेट्या, इलेक्ट्रॉनिक माहिती फलक यासारख्या सुविधांमध्ये त्रुटी आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, देशातील विविध राज्यातील रेल्वे स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या (Contaminated Water) गुणवत्तेबाबत आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर कॅगने रेल्वेला पाण्याची सर्वसमावेशक गुणवत्ता तपासणी करण्याची शिफारस केली आहे. तसेच पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भातील विहित नियमावलीचे काटोकोर पालन सुनिश्चित करण्याची सूचना केली आहे. स्थानकांवरील पिण्याचे पाणी आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधाकडे लक्ष देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
४५८ स्थानकांत सुविधा अपु-या
कॅगच्या पाहणीत केवळ पाण्याच्या गुणवत्तेचीच समस्या नाही, तर रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सुविधाही अपु-या आहेत. निवडलेल्या ५१२ स्थानकांपैकी ४५८ स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांत ज्या अपु-या सुविधा आहेत. त्यामध्ये प्रतीक्षागृह, पंखे, पादचारी पूल, कचरापेटया, शौचालये, मूत्रालये, नळ बसवण्याची जागा तसेच इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे.






