जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरची कारवर पलटी; दोघांचा मृत्यू

लोणावळा : खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर स्विफ्ट कारवर पलटी झाला. या अपघातात कारमधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एम.एच. 14 एफ.टी. 1445) हा समोरून येणाऱ्या कारवर (एम.एच. 14 बी.एक्स. 1605) पलटला. प्राथमिक माहिती नुसार सदर कार ही अलिबाग वरून तळेगाव, मावळ या दिशेने निघाली होती.
या कारमधून तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते. अपघातात दतात्रय रामदास चौधरी (वय 55) आणि कविता दतात्रय चौधरी (वय 46), या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर भूमिका दतात्रय चौधरी (वय 16) व मितांश दतात्रय चौधरी (वय 9, सर्व रा. निमडाळे, धुळे, सध्या रा. देवकणपिंपरी, जळगाव) योगेश श्रीराम चौधरी (वय 40), जान्हवी योगेश चौधरी (वय 31), दिपांशा योगेश चौधरी (वय 9) आणि जिगीशा योगेश चौधरी (वय दीड), चौघेही रा. संस्कृती बिल्डींग, राव कॉलनी, तळेगाव) हे सहा जण किरकोळ जखमी झाले आहे. सर्व जखमींना जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची खबर मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला या बचाव पथकाचे सदस्य, महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. सर्वप्रथम कार मध्ये अडकलेले सर्व जखमी तसेच दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या मदतीने सदर अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला केली. अपघातानंतर कंटेनरचा चालक पळून गेला.





